Local Body Elections (File Photo)
रायगड

Raigad ZP Election | रायगड जिल्हा परिषद निवडणूक : जिल्ह्यात २ हजार ३२३ मतदान केंद्र

स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ठिकठिकाणी युती-आघाड्या स्थापन

पुढारी वृत्तसेवा

Election Administration Raigad

अलिबाग: रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदानप्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात २ हजार ३२३ मतदान केंद्र आहेत. १७ लाख ३८१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी १७३ तर १५ पंचायत समित्यांमध्ये ३२९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार ठिकठिकाणी युती-आघाड्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर एक निवडणूक अधिकारी तसेच तीन कर्मचारी व एक शिपाई नेमण्यात आला आहे. याव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहे. मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून ही पथके मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आरक्षण, मतदान यादी, मतदार केंद्र निश्चित झाले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये १७ लाख ३८१ मतदार आहेत. त्यात ८ लाख ५७ हजार ९ महिला आणि ८ लाख ४६ हजार ३४७ पुरुष तसेच इतर २५ मतदारांचा समावेश आहे.

जिल्ह्यात २ हजार ३२३ मतदान केंद्र आहेत. पनवेल ३४६ मतदान केंद्र असून, कर्जत २२०, खालापूर १४४, सुधागड ७५, पेण १९०, उरण १३५, अलिबाग २६१, मुरुड ८१, रोहा १९४, तळा ५२, माणगाव २०६, म्हसळा ६९, श्रीवर्धन ८०, महाड २०३, पोलादपूर ६७ मतदान केंद्र आहेत.

२०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने २३ जागांवर विजय मिळविला होता. तर शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस १२, काँग्रेस ३ व भाजपने ३ जागांवर विजय मिळविला होता. यानंतर शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीची अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शेवटची अडीच वर्ष शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT