अलिबाग: रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या १३४ नव्या उपशिक्षकांची समुपदेशन व समायोजन प्रक्रिया ३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद सभागृहात पारदर्शक पद्धतीने पार पडली.
यामध्ये मराठी माध्यमाच्या १३२ आणि उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांचा समावेश असून, शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील तब्बल ४२ 'शून्य शिक्षकी' शाळांना हक्काचे शिक्षक लाभले असून, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मोठा अडसर दूर झाला आहे.
या समुपदेशन प्रक्रियेवेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, शिक्षण व अर्थ सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) तथा प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जालिंदर पठारे, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपाळे, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्यासह शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कागदपत्र पडताळणीअंती १३२ उमेदवार ठरले पात्र
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला यापूर्वी पहिल्या टप्प्यात ३५१ शिक्षक मिळाले होते. त्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे नव्याने १४५ शिक्षकांची निवड यादी प्राप्त झाली होती. यामध्ये मराठी माध्यमाचे १४३ आणि उर्दू माध्यमाचे २ असे एकूण १४५ उमेदवार होते.
शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये मराठी माध्यमाचे १४३ पैकी १३२ उमेदवार पात्र ठरले, तर ११ उमेदवार विविध कारणांमुळे अपात्र ठरले. उर्दू माध्यमाचे दोन्ही उमेदवार पात्र ठरल्याने एकूण १३४ उपशिक्षकांची समायोजनासाठी अंतिम निवड करण्यात आली.
पारदर्शक समुपदेशनातून शाळांची निवड
पात्र १३४ उपशिक्षकांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशन प्रक्रिया राबवण्यात आली. उमेदवारांसमोर सर्वसाधारण आणि अवघड क्षेत्रातील रिक्त जागांची पारदर्शक यादी मांडण्यात आली होती. गुणवत्तेनुसार उमेदवारांना थेट आपल्या पसंतीची शाळा निवडण्याची मोकळीक दिल्याने कोणतीही तक्रार न होता ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.
मराठी माध्यमात अद्याप ४७, तर उर्दूत ६ पदे रिक्त
समुपदेशनासाठी मराठी माध्यमाच्या १३२, तर उर्दू माध्यमाच्या ४ शाळा ठेवण्यात आल्या होत्या. मराठी माध्यमाच्या या १३२ शाळांमध्ये एकूण ३२९ उपशिक्षकांची पदे मंजूर असून, त्यापैकी १५० पदे कार्यरत तर १७९ पदे रिक्त होती.
नव्याने रुजू झालेल्या १३२ शिक्षकांमुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली असली, तरी अद्याप ४७ पदे रिक्त राहिली आहेत. दुसरीकडे, उर्दू माध्यमाच्या ४ शाळांमध्ये मंजूर असलेली सर्वच्या सर्व ८ पदे रिक्त होती. त्यापैकी सध्या २ पदांवर शिक्षक नियुक्त करण्यात आले असून, उर्वरित ६ पदे अजूनही रिक्त आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार, शिक्षकांवरील ताण घटला
नव्याने पदस्थापना मिळालेल्या शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ४० सर्वसाधारण आणि २ अवघड क्षेत्रातील अशा एकूण ४२ 'शून्य शिक्षकी' शाळांना पहिल्यांदाच नियमित शिक्षक मिळाले आहेत. याशिवाय दुर्गम व डोंगराळ भागातील ५६ अवघड क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांची उणीव भरून निघाली आहे.
यामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांचा डोलारा सांभाळणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांवरील ताण कमी झाला असून, विद्यार्थ्यांच्या नियमित गुणवत्तेचा मार्ग प्रशस्त झाला आहे.