रायगडात पाऊस झाला गायब, उन्हाची तीव्रता मात्र वाढली Pudhari News Network
रायगड

Raigad Weather Update: आषाढातच जाणवतात वैशाखाचे चटके

रायगडात पाऊस झाला गायब, उन्हाची तीव्रता मात्र वाढली

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग (रायगड): अतुल गुळवणी

वैशाख मासात आषाढधारेसारखा कोसळणारा वरुणराजा आषाढात चक्क गायब झालाय. रायगडात ऐन आषाढात धोधो कोसळणारा पाऊस श्रावणसरींसारखा अधूनमधून रिमझिमपणे दिवसभरात कधीतरी एखादी सर कोसळत खरा, पण त्यात म्हणावा तसा जोर नसल्याने ऐन आषाढातच रायगडात वैशाखाचे चटके जाणवू लागले आहेत. रविवारी (दि.13) रायगडाती बहुतांशी शहरांचे तापमान कमाल 29 ते 31 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.

रायगडसह कोकण म्हणजे पावसाचे आगर. पण गेल्या काही वर्षात ऋतुचक्रात बदल झाल्याने कोकणाचा पाऊस हा बेभरवशाचा झाला आहे. यंदाही त्याची झलक मे पासून दिसून आली आहे.ऐन वैशाखाता हा वरुणराजा आषाढातील जरधारांसारखा धो धो कोसळत होता. ऐन मे मध्येच अनेक नद्यांना पूर येण्याची घटना याच काळात घडल्या. रायगडात सावित्री, झालकुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास आदी नद्यांना मे महिन्यात पूर आला होता. त्यानंतर ज्येष्ठात समाधानकारक पडलेल्या पावसाने ऐन आषाढात मात्र आपला लहरीपणा दाखविण्यास सुरुवात केली. आषाढ एकादशीलाही पावसाने हलकीशी हजेरी लावली. त्यानंतहही पावसाचे प्रमाण काही वाढले नाही.

धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठी

मेमध्ये पडलेल्या पावसाने रायगडातील 28 धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे.वास्तविक रायगडातील ही सर्व धरणे भरण्यासाठी 25 जुलैपर्यंतचा कालावधी लागतो. पण यावेळी मे मध्ये वरुणराजाच्या दमदार हजेरीने घरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे.

भातलावणीला वातावरण

आषाढातील पावसाने विश्रांती घेतल्याने रायगडात खरीप लागवडीला मात्र आता चांगलाच वेग आला आहे. जिल्ह्यात 80 हजार हेक्टरावर भातलागवड केली जात यापूर्वी पडलेल्या पावसाने भात लागवडीसाठी पोषक भूमी तयार झाल्याने ही लागवड यशस्वी झाली आहे. अजूनही काही ठिकाणी भातलागवड केली जात आहे. आता मात्र जोरदार पावसाची अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त होत आहे.

तरण्याने दिला दगा...

पंचांगशास्त्रानुसार 5 जुलैला पुनर्वसू नक्षत्राचा प्रारंभ मध्यरात्री झाला आहे.पंचागात या नक्षत्रात पडणार्‍या पावसाला तरणा पाऊस असे संबोधले जाते. 5 जुलैला आषाढ शुद्ध दशमी ही तिथी होते.याचाच अर्थ आषाढातील धोधो पाऊस पडणे अपेक्षित होते. या नक्षत्राचे वाहन हे घोडा आहे. या काळात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दि. 18 जुलैपयर्र्ंत या नक्षत्राचा कालावधी आहे.अजून हे नक्षत्र संपायला अजून पाच दिवसांचा कालावधी आहे. या काळात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

म्हातारा पाऊस तारणार...

यानंतर दि.19 जुलैला सूर्यदेव पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.मोरावर आरुढ होऊन त्यांचे आगमन होणार आहे.या काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहे. 1 ऑगस्टपर्यंत या नक्षत्राचा कालावधी आहे.19 जुलैला या नक्षत्राचा प्रारंभ आषाढ कृष्ण नवमीला होत आहे. त्यापुढे सहा दिवस जरी पावसाने हजेरी लावली तरी आषाढातील शिल्लक कोटा पूर्ण होईल की नाही याबाबत सांशकता आहे.

रायगडात 13 जुलैपर्यंत पडलेला पाऊस असा...

रायगडात 13 जुलैपर्यंत पडलेल्या पावसाच्या नोंदीत आजअखेर 3148 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या 13 दिवसात 232 मिमी तर रविवारी अवघा 5. 6 मिमी पावसाची नोंद महारेन या वेबसाईटवर नोंदविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT