Raigad water crisis Pudhari File photo
रायगड

Raigad water crisis: रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

64 गावे आणि 230 वाड्यांतील 1 लाख 13 हजार नागरिकांना टँकरचा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

रायगड: जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाईग्रस्त भागात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

25 मे 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 65 खासगी टँकर सुरू करण्यात आले असून, याद्वारे 64 गावे आणि 230 वाड्यांमधील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.

सध्या सुरू असलेले सर्व टँकर हे खासगी स्वरूपातील असून, एकही शासकीय टँकर कार्यान्वित नाही. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन टंचाईग्रस्त भागावर बारीक लक्ष ठेवून आहे.

पेण-महाड टंचाईची सर्वाधिक झळ

जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती पेण आणि महाड तालुक्यांत पाहायला मिळत आहे. पेण तालुक्यात दुर्गम भाग आणि वाड्यांची संख्या अधिक असल्याने येथे सर्वाधिक 12 टँकर धावत आहेत. याद्वारे 9 गावे आणि 76 वाड्यांमधील 24 हजार 746 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

महाड तालुक्यातही परिस्थिती गंभीर असून, तेथे 14 गावे आणि 87 वाड्यांमधील 22 हजार 243 नागरिकांची तहान भागवण्यासाठी 9 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या तालुक्यांना दर वर्षी पाणी टंचाईची समस्या भेडसात असते. तेथे उपाययोजनांची गरज आहे.

टँकर फेऱ्या वाढल्या

पनवेल तालुक्यात 10 गावे आणि 8 वाड्यांमधील 18 हजार 553 नागरिकांसाठी 9 टँकर सुरू करण्यात आले आहेत. कर्जत तालुक्यात 3 गावे व 11 वाड्यांसाठी 8 टँकर, खालापूर तालुक्यात 5 गावे व 9 वाड्यांसाठी 6 टँकर, तर माणगाव तालुक्यात 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर कार्यरत आहेत.

या प्रमुख तालुक्यांव्यतिरिक्त अलिबाग तालुक्यातील 4 गावे, उरणमधील 4 वाड्या, सुधागड-पालीतील 2 वाड्या, रोह्यातील 3 गावे, पोलादपूरमधील 5 गावे व 14 वाड्या, म्हसळ्यातील 6 गावे व 1 वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यातील 1 गाव व 3 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हा प्रशासन सज्ज

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत वाढत्या मागणीचा विचार करता जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे.

टंचाईग्रस्त भागात आवश्यकतेनुसार तात्काळ अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांना नियमित पाणी मिळावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT