Shrivardhan fishing project: अत्याधुनिक बंदरामुळे श्रीवर्धनमध्ये घडणार मत्स्यक्रांती

भरडखोल येथे मत्स्य बंदर; 167 कोटींचा प्रकल्प; अत्याधुनिक लिलाव केंद्र; कोल्ड स्टोरेज सुविधा; रोजगारवाढीला मोठी संधी
Bharadkhol fishing port project
Bharadkhol fishing port projectPudhari
Published on
Updated on

भारत चोगले

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथे उभारण्यात येणारा 167.22 कोटी निधीचा आधुनिक मत्स्यबंदर प्रकल्प हा संपूर्ण किनारपट्टीच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

यामुळे तालुक्यातील हजारो मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून विकसित होणारा हा प्रकल्प केवळ बंदरापुरता मर्यादित नसून मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वाहतूक, कोल्ड स्टोरेज, बर्फ उद्योग आणि स्थानिक रोजगार यांना नवे बळ देणारा ठरणार आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील जीवनाबंदर, मुळगाव कोळीवाडा, दिवेआगर, भरडखोल, कुडगाव, आदगाव, बागमांडला आणि दिघी परिसरातील मच्छीमार मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत.

मात्र आजपर्यंत योग्य बंदर सुविधा, सुरक्षित नांगर व्यवस्था आणि स्थानिक स्तरावर लिलाव केंद्र उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, नवी मुंबई, पुणे यांसारख्या घाऊक बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि आर्थिक जोखीम मोठ्या प्रमाणात वाढत होती.

भरडखोल येथे आधुनिक जेट्टी, मासळी लिलाव केंद्र, कोल्ड स्टोरेज, बर्फ निर्मिती सुविधा आणि सुरक्षित बोट पार्किंग उभारले जाणार असल्याने मच्छीमारांना आता स्थानिक पातळीवरच व्यापाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मासळी अधिक काळ ताजी ठेवता येणार असल्याने बाजारभाव चांगला मिळेल आणि थेट नफ्यात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रकल्पांतर्गत सुमारे 500 ते 600 मच्छीमार बोटींसाठी सुरक्षित व सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच 650 मीटर लांबीचा ब्रेकवॉटर, क्वे वॉल आणि संरक्षण भिंत उभारण्यात येणार असल्याने वादळ, भरती आणि खराब हवामानात बोटींचे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. बंदर परिसरातील गाळ उपसल्यामुळे समुद्रातून किनाऱ्यावर ये-जा करणे अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.

रायगड जिल्ह्यातील करंजा, धरमतर, मांडवा, रेवस, मोरा, रेवदंडा यांसारख्या सुरक्षित बंदरांच्या यादीत भरडखोल बंदराचाही समावेश होणार असल्याने श्रीवर्धन तालुक्याच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

विशेष म्हणजे भरडखोल हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तालुक्यातील सर्व किनारी गावांतील मच्छीमारांना या प्रकल्पाचा थेट फायदा होणार आहे. अत्याधुनिक बंदर उभारणीमुळे किनारपट्टीवरील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.

बंदर प्रकल्पामुळे मिळणार प्रमुख सुविधा

500 ते 600 मच्छीमार बोटींसाठी सुरक्षित पार्किंग व्यवस्था, 650 मीटर लांबीचा ब्रेकवॉटर व संरक्षण भिंत अत्याधुनिक मासळी लिलाव केंद्र, कोल्ड स्टोरेज व बर्फ निर्मिती सुविधा, गाळ उपसा करून सुरक्षित जलमार्ग निर्मिती, मत्स्य प्रक्रिया, पॅकेजिंग व वाहतूक उद्योगांना चालना, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

सुरक्षित नांगर व्यवस्था, स्थानिक लिलाव केंद्र आणि आधुनिक सुविधा मिळाल्याने वाहतूक खर्च कमी होऊन आर्थिक बचत होणार आहे. बंदर विकसित झाल्यानंतर मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळेल.

- हरिओम चोगले, मच्छीमार व्यावसायिक, भरडखो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news