सराईत चोरट्याला उरण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने जेरबंद केले.  Pudhari
रायगड

Uran Crime | उघड्या खिडकीतून घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद; ९.६४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उरण पोलिसांची २६ दिवस सलग शोधमोहीम; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा माग काढून खालापूर टोलनाक्याजवळ केली अटक

पुढारी वृत्तसेवा

Uran Burglar Arrested

उरण : घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला उरण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने जेरबंद केले. अनिल लक्ष्मण नाईक (वय ४४, रा. पनवेल, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ९ लाख ६४ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील आवरे येथे १७ जुलै २०२६ रोजी बंद घराच्या उघड्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने ९ लाख ७७ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून आरोपीची ओळख पटली. मात्र, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी सतत ठिकाण बदलत होता. सोलापूर, अक्कलकोट, चाकण, आदमापूर आणि कोल्हापूर येथील लॉज व डॉर्मेटरीमध्ये तो वास्तव्य करत असल्याचे तपासात समोर आले.

पोलिस पथकाने तब्बल २६ दिवस त्याचा माग काढला. अखेर कोल्हापूरहून पनवेलच्या दिशेने प्रवास करत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाक्याजवळ आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी त्याला रीतसर अटक करण्यात आली.

चौकशीत अनिल नाईक याने उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ९ लाख ६४ हजार ३०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध नवी मुंबई आणि रायगड परिसरात घरफोडी व जबरी चोरीचे सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर आयुक्त प्रमोद शेवाळे आणि उपायुक्त अमित काळे यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक आयुक्त विजय चौधरी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल काटवाणी, उपनिरीक्षक गोविंद केंद्रे आणि त्यांच्या पथकाने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT