माणगाव ः गेल्या काही दिवसापासून पुणे तसेच मराठवाडा भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे पडसाद आता कोकणातही उमटू लागले असून, रायगड जिल्हातील माणगाव तालुक्यात गुरुवारी ता. 2 एप्रिल रोजी दुपारी अचानक झालेल्या अवकाळीच्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे.
या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू या फळपिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः आंब्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यात सध्या कडधान्य पिकांची काढणी आणि मळणी सुरू आहे. वाल, मुग, पावटा, चवळी, हरभरा ही पिके शेतात किंवा मळणीत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतांमध्ये उभे असलेले कलिंगड पिकही धोक्यात आले आहे. निसर्गाच्या लहरीतून कसेबसे सावरलेले फळपिक व कडधान्य पीकाला अवकाळीचा फटका होशील अशी शेतकऱ्यांची भीती खरी ठरली.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हवामानातील वातावरणात मोठे बदल जाणवत होते. त्यातच अचानक झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे कांही काळ माणगावची बाजारपेठ ठप्प झाली. नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती.
अखेर त्या भीतीचे वास्तवात रूपांतर झाले असून, आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन बिघडले असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील काही दिवस सतर्कतेचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसाच्या वाढत्या घटनांकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहून चालणार नाही. हे बदलत्या हवामानाचे गंभीर संकेत आहेत. कोकणा सारख्या पारंपरिक दृष्ट्या स्थिर हवामान असलेल्या भागातही अशा अनियमित पावसाची पुनरावृत्ती होत असल्याने शेती व्यवस्थेचे नियोजन नव्याने करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्या बरोबरच दीर्घकालीन उपाययोजना पिक विमा, हवामान आधारित शेती सल्ला आणि साठवण सुविधा याकडे शासनाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
खोपोलीत नागरिकांची उडाली तारांबळ
खोपोली : खोपोली शहरात गुरुवारी 2 एप्रिल रोजी भर दुपारी 15 मिनिट विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाने खोपोलीकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी साचले होते. भर दुपारी शहरात अंधार पडला असून अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस बरसत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी हनुमान मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक तसेच बाजारहटीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. हाच अवकाळी पाऊस गुरुवारी खोपोली शहरात जोरदार बरसला. भर दुपारी खोपोली शहरात अंधार पडला आणि पाऊस सुरू झाला. जवळपास 15 मिनिट हा पाऊस सुरू राहिल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पहायला मिळाले. त्यातच आज हनुमान जयंती असल्याने सर्वच मंदिरांमध्ये भविकांची प्रचंड गर्दी होती. अवकाळी पावसामुळे त्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
अचानक अवकाळी पाऊस झाल्याने आंब्याचे मोहर, वीटभट्टी व्यावसायिक, घरांची कामे हाती घेतलेल्यांंची तारांबळ उडाली असून झालेल्या अवकाळी मुसळधार पाऊस पडल्याने वीटभट्टी व्यावसायिक धास्तवले आहेत.दरम्यान,पावसाने मात्र हवेत चांगलाच गारवा निर्माण झालेला होता.