अलिबाग :दिवाळी नंतर पर्यटन हंगामात शैक्षणिक सहलींचाही मोठा वाट असतो. वार्षिक स्नेहसंमेलनाची धूम आणि सहली यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. रायगड जिल्ह्या हा पर्यटनसोबत ऐतिहासिक बाबींसाठी हि प्रसिद्ध आहे. सध्या शैक्षणिक सहलींना समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांनी गजबजलेले आहेत.
दिवाळी सुटीनंतर, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या थंडीच्या हंगामात अनेक शाळा शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात. शाळेमध्ये विविध विषयांचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकातील अनेक स्थळे व घडामोडींची ओळख विद्यार्थ्यांना शालेय सहलीतून होत असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीही अशा शालेय सहली उपयुक्त ठरतात.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, पर्यटन स्थळांची माहिती मिळावी, सहलीच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी बनवता यावे या दृष्टिकोनातून शालेय सहली आयोजित केल्या जातात. राज्यभरातून अनेक शाळांच्या सहली सध्या रायगड जिल्ह्यात दाखल होत आहे. यामध्ये रायगड किल्ल्याला विशेष पसंती दिली जात आहे. छत्रपती शिवरायांचा पराक्रम व रायगड किल्ला यांचे अभ्यासक्रमातही मोलाचे स्थान असल्याने गडकिल्ल्यावरील सहलीला शाळांमधून खास पसंती दिली जात आहे.
आर्थिक उलाढालीत वाढ
विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात. या पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स, दुकाने, छोटे व्यावसायिक आदिंची आर्थिक उलाढालही वाढली आहे. अनेक ठिकाणी हॉटेल, कॉटेजेसमध्ये शालेय सहलींसाठी राहणे व जेवणाच्या किंमतींमध्ये सूटही दिली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्राची रायगडला पसंती
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भासारख्या दूरवरून येणा-या विद्याथ्र्यांना समुद्राचे अधिक आकर्षण असते. अशावेळी समुद्र स्नानाचा किंवा वॉटर स्पोर्ट्सचा मोह आवरता येत नाही. गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांच्या पाश्वभूमिवर महत्त्वाच्या किना-यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी नवीन नियमनावलीनुसार विद्याथ्र्यांना समुद्राच्या पाण्यात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
सहलींना नेण्यासाठी त्या त्या शाळांना शिक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते तसेच पालकांकडूनही साहिलला मुलांना पाठवण्याची परवानगीचे पात्र घेणे बांधकारक असल्याचे प्राथामिक शिक्षणाधिकारी लतिका दहितुले यांनी सांगितले.
रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली येत असून विद्यार्थ्यांना रोप वेकडून विशेष सवलतीही दिली जात आहे. याचा फायदा अनेक शाळा घेत आहेत. राज्यातील अनेक भागांतून सहली दाखल होत आहेत.राजेंद्र खातू, व्यवस्थापक, रायगड रोप वे
पुस्तकात शिकलेली स्थळे, इतिहास तसेच विविध ऐतिहासिक घटनांची माहिती सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता येते. त्यामुळे त्यांच्यातील चिकित्सक वृत्ती जागृत होत असून विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद घेता येतो.दीप्ती राऊळ, शिक्षक