Raigad Tree Cutting pudhari photo
रायगड

Raigad Tree Cutting : अफाट छत्रविस्ताराच्या महाकाय 'रेन ट्री'ची कत्तल चिंताजनक

बाष्प हवेतून गायब, भूजल पातळीत ६० टक्क्यांपर्यंत घसरणीचा गंभीर धोका

पुढारी वृत्तसेवा

रायगड : औद्योगिक आणि ऊर्जा विकासाच्या नावाखाली टोरेंट वीज प्रकल्पासाठी तब्बल ३६,००० महाकाय वृक्षांची झालेली कत्तल स्थानिक परिसंस्थेच्या मुळावर उठली आहे. यामध्ये ३० ते ५० मीटरपर्यंत अफाट छत्रविस्तार असलेल्या महाकाय 'रेन ट्री'च्या (विलायती शिरीष) कत्तलीचा प्रामुख्याने समावेश असून, त्यासोबतच वड, पिंपळ, जांभूळ आणि उंबर यांसारख्या शेकडो वर्षे जुन्या स्थानिक वृक्षांचाही बळी गेला आहे.

या महाकाय रेन ट्री आणि स्थानिक वृक्षांच्या नाशामुळे परिसरातील जलचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून, दररोज १.०८ कोटी लिटर पाण्याचे बाष्प वातावरणात जाणे बंद झाले आहे. परिणामी, आगामी काळात या भागात पर्जन्यमानात मोठी घट होऊन दुष्काळसदृश परिस्थिती आणि तीव्र उष्णतेच्या लाटांच संकट ओढवण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पूर्ण वाढलेला एक रेन ट्री किंवा वटवृक्ष हा केवळ वृक्ष नसून ती एक स्वयंपूर्ण सूक्ष्म-परिसंस्था असते. एका महाकाय वृक्षामध्ये सरासरी २० ते ३० लहान झाडांइतका जैवभार (Biomass) आणि पर्णसंपदा असते. त्यामुळे ३६,००० जुनी झाडे तोडणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्षमतेचा विचार करता लाखो झाडे नष्ट करण्यासारखे आहे.

पावसाचे गणित कसे बिघडणार?

वृक्षतोडीमुळे स्थानिक पाऊस आणि हवामानावर थेट आधात होणार आहे. एक पूर्ण वाढलेला महाकाय वृक्ष दिवसाला सरासरी ३०० लिटर पाणी बाष्पाच्या स्वरूपात हवेत सोडतो. ३६,००० झाडे तोडल्याने दररोज १ कोटी ८ लाख लिटर, म्हणजेच वार्षिक सुमारे ३.९४ अब्ज लिटर बाष्प वातावरणात जाणे थांबले आहे. स्थानिक पातळीवर ढंग निर्मितीसाठी हे बाष्प अत्यंत आवश्यक असते.

याशिवाय झाडे हवेत सूक्ष्म जैविक घटक (BVOCs) सोडतात, जे पाण्याचे थेंब एकत्र येऊन पाऊस पडण्यासाठी 'केंद्रके' म्हणून काम करतात. ही प्रक्रिया मंदावल्याने ढग असुनही पाऊस न पडण्याची स्थिती निर्माण होईल. तसेच हिरवे आच्छादन नष्ट झाल्याने जमिनीचे तापमान २ ते ५ अंश सेल्सिअसने वाढणार असून, अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे हवेचा दाब कमी होऊन वाऱ्यांची दिशा बदलेल आणि पावसाचे ढंग न बरसताच पुढे निधून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हीट आयलँड इफेक्ट आणि पुराचा धोका

वृक्षांची जागा आता काँक्रीट, पोलाद आणि यंत्रसामग्री घेणार असल्याने उन्हाळ्यात 'हीट आयलैंड इफेक्ट' निर्माण होऊन असह्य उकाडा जाणवेल. तसेच, पावसाचे दिवस कमी होऊन अचानक ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याचे प्रमाण वाढेल. जमिनीधी सच्छिद्रता संपल्याने हे पाणी जमिनीत न मुरता थेट वाहून जाईल, ज्यामुळे मातीची धूप आणि पूरस्थिती निर्माण होऊ शकते.

पर्यावरणीय भरपाईची तातडीची गरज

या पर्यावरणीय हानीची तीव्रता कमी करण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे. नियमानुसार तोडलेल्या एका वृक्षामागे किमान ५ ते १० स्थानिक प्रजातींची, म्हणजेच वड, पिंपळ, कडुनिंब, जांभूळ, करंज आणि आंबा यांसारखी झाडे लावून ती किमान ७ वर्षे जगवण्याची सक्ती प्रकल्पावर करावी, तसेच प्रकल्पाच्या सीमेवर 'मियावाकी' पद्धतीने घनदाट वन पट्टे (Green Belts) तात्काळ उभारावेत, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

पर्यावरणाचा रक्षक रेन ट्री' का महत्त्वाचा?

मुळचा उष्णकटिबंधीय प्रदेशातील आणि 'विलायती शिरीष' (Samanea saman) नावाने ओळखला जाणारा रेन ट्री हा त्याच्या अफाट छत्रविस्तारासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या मोठ्या छत्रीसारखा ३० ते ५० मीटरपर्यंत पसरलेला याचा पर्णसंभार खालील जमिनीला आणि सजीवांना थंडगार सावली देतो. रात्रीच्या वेळी या वृक्षाची पाने मिटतात, ज्यामुळे पहाटेचे दव थेट जमिनीवर पडते आणि खालील गवत व माती नेहमी ओलसर राहते. प्रचंड प्रमाणात कार्बन शोषून घेणे आणि हवेतील आर्द्रता टिकवून ठेवणे ही या वृक्षाची खासियत असल्याने स्थानिक हवामान संतुलित ठेवण्यात रेन ट्रीची भूमिका अनन्यसाधारण असते.

पर्यावरणीय नुकसानीचा गंभीर लेखाजोखा

या ३६,००० वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे वार्षिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. या वृक्षतोडीमुळे दरवर्षी सुमारे ७९२ मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड शोषला न जाता हवेतच साचून राहणार आहे, तर तब्बल ४,२४८ मेट्रिक टन प्राणवायूची (ऑक्सिजन) वार्षिक तूट निर्माण होणार आहे. त्यासोबतच वार्षिक ३.९४ अब्ज लिटर नैसर्गिक बाष्प हवेतून गायब होणार असून, वृक्षांची खोल मुळे नष्ट झाल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची व भूजल पुनर्भरणाची क्षमता तब्बल ४० ते ६० टक्क्यांनी घटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT