SKP Raigad pudhari photo
रायगड

SKP Raigad Politics: रायगडमध्ये शेकापचा अस्ताचा इशारा; सत्तेच्या मक्तेदारीतून वैचारिक पराभवाकडे वाटचाल

जिल्हा परिषदेत शून्य जागा, अंतर्गत कलह आणि बदल नाकारण्याची किंमत जनतेने चोख दिली

पुढारी वृत्तसेवा

महाड : श्रीकृष्ण बाळ

एकेकाळी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात लालबावटा विरुद्ध काँग्रेस अशी वैचारिक आणि लढाऊ राजकीय रेषा स्पष्ट होती. त्या संघर्षात विचारसरणी होती, तत्त्वनिष्ठा होती आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी होती. मात्र काळ बदलला, पिढ्या बदलल्या, आणि त्या बदलासोबत स्वतःला बदलण्यात अपयशी ठरलेला शेतकरी कामगार पक्ष आज राजकीय अस्तित्वाच्या अंतिम टप्प्यावर उभा आहे.

कालांतराने ही लढाई ‌‘शेकापक्ष विरुद्ध सर्व पक्ष‌’ अशी झाली, पण ती वैचारिक संघर्षातून नव्हे, तर सत्तेच्या मक्तेदारीतून निर्माण झालेली लढाई ठरली. कायमस्वरूपी सत्तेत राहण्याचा अट्टाहास, सत्तेला चिकटून राहण्याची मानसिकता आणि पर्यायी नेतृत्व दाबून टाकण्याची भूमिका याच गोष्टी शेकापक्षाच्या अधःपतनास कारणीभूत ठरल्या.

जिल्हा परिषद ही जनतेच्या विकासाची प्रयोगशाळा असते; मात्र ती शेकापक्षासाठी सत्तेची जहागिरी बनवण्यात आली. जनतेच्या प्रश्नांपेक्षा पदे, खुर्च्या, ठेके आणि नियंत्रण यांना प्राधान्य देण्यात आले. परिणामी, जनतेनेच आता या पक्षाला स्पष्ट शब्दांत नकार दिला असून, पुढील पाच वर्षांसाठी रायगड जिल्हा परिषदेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे.

या पराभवानंतर शेकापक्ष नेमकी कोणती भूमिका घेतो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मचिंतन करून बदल स्वीकारणार का? की नेहमीप्रमाणे दोष इतरांवर ढकलून जुन्याच चौकटीत अडकून राहणार? कारण हा निकाल स्पष्ट सांगतो रायगड जिल्ह्यातील डावी विचारसरणीला हा केवळ धक्का नाही, तर गंभीर इशारा आहे. राजकारणात इतिहास महत्त्वाचा असतो, पण तोच इतिहास जर वर्तमानात अपयशाचे ओझे ठरू लागला, तर जनता नव्या पर्यायाकडे वळते. रायगडच्या जनतेने तेच करून दाखवले आहे. बदल नाकारणाऱ्या राजकारणाला नाकारण्याचा हा निर्णय आहे.

मागील जि.प. निवडणुकीत शेकापने सर्वाधिक म्हणजे 24 जागा जिंकल्या होत्या.त्यानंतर पक्षातझालेली फूट,अंतर्गत कलह यामुळे पक्षाची मोठी वाताहात झाली.याचे परिणाम विधानसभा निवडणुकीतही दिसून आले.त्यावेळीही शेकापला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.आता तर जिल्हा परिषदेतही शेकापला भोपळाही फोडता आलेला नाही.हे पक्षासाठी अतिशय लाजिरवाणे ठरले आहे.याचा मोठा परिणाम आगामी काळात होण़ाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीही होण्याचीशक्यता आहे.

जनतेच्या संयमाचाफुटलेला बांध

हा पराभव एखाद्या निवडणुकीतील आकड्यांचा खेळ नाही, तर तो जनतेच्या संयमाचा फुटलेला बांध आहे. शेतकरी, कामगार, युवक आणि नव्या मतदारांनी एकत्र येत शेकापक्षाच्या सत्तेच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला आहे. ‌‘आम्हीच पर्याय‌’ ही भूमिका मतदारांनी पूर्णतः फेटाळून लावली आहे. ज्या पक्षाने कधीकाळी शोषितांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, तोच पक्ष आज सत्तेचा रक्षक आणि परिवर्तनाचा शत्रू म्हणून पाहिला जाऊ लागला, हीच त्याची सर्वात मोठी हार आहे. अंतर्गत लोकशाहीचा अभाव, घराणेशाहीसारखी पकड, नव्या नेतृत्वाची गळचेपी आणि आत्मपरीक्षण करण्यास असमर्थता या साऱ्या गोष्टींनी शेकापक्षाला राजकीयदृष्ट्या कोपऱ्यात नेऊन उभे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT