अलिबाग : तालुक्यातील सहानगोठी येथे मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिल्याने रस्त्यालगतची साईड पट्टी खचली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डोंगरावरील माती, दगड व कचरा पावसाच्या पाण्यासोबत खाली येऊन रस्त्यावर साचत असल्याने वारंवार अडथळे निर्माण होतात. नुकतेच रस्त्याचे काम पूर्ण होऊनही पावसाळ्यात ही समस्या कायम असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित ठिकाणी तातडीने पूल उभारण्यात यावा. तसेच रस्त्यालगत पावसाचे पाणी योग्य प्रकारे वाहून जाण्यासाठी गटार बांधण्यात यावे; अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.