Raigad Ropeway Pudhari Photo
रायगड

Raigad Ropeway Project | रायगड रोपवे प्रकल्पाचे बांधकाम शासकीय परवानगीनुसारच; प्रशासनाचा खुलासा

किल्ले रायगडावर जाण्यासाठी हिरकणी वाडी येथे उभारण्यात आलेल्या रायगड रोपवे प्रकल्पाचे बांधकाम पूर्णपणे अधिकृत

पुढारी वृत्तसेवा

Raigad Fort Ropeway Project

महाड: किल्ले रायगडावर जाण्यासाठी हिरकणी वाडी येथे उभारण्यात आलेल्या रायगड रोपवे प्रकल्पाचे बांधकाम पूर्णपणे अधिकृत असून, शासनाच्या आणि पुरातत्व विभागाच्या नियमांनुसारच करण्यात आल्याचा खुलासा रोपवे प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुरातत्व विभागाच्या परवानगीनेच काम

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, १९९६ मध्ये सुरू झालेला रायगड रोपवे प्रकल्प मागील ३० वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या वर्षी रायगडासह ११ किल्ल्यांचा 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर, आयसीओएमओएस (ICOMOS) संस्था, जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाने परिसरातील इमारतींचे बाह्य स्वरूप ऐतिहासिक काळाशी सुसंगत असावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जुन्या बांधकामात कोणतेही अतिरिक्त बदल न करता, केवळ बाह्य स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.

रोपवे प्रशासनाने नेमके काय बदल केले?

रोपवे लँडिंग स्टेशनच्या जुन्या शेडच्या लोखंडी फ्रेमला ऐतिहासिक आकार देण्यासाठी सिमेंटचे तक्ते लावले आहेत.

यावर शिवकालीन वास्तूचे स्वरूप यावे म्हणून एफआरपी (FRP) डिझाइनचा वापर केला आहे.

या कामात कोठेही काँक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही.

प्रसारमाध्यमांतून अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॅफे उभारल्याचे जे आरोप होत आहेत, ते पूर्णपणे निराधार आहेत.

शिवभक्तांच्या सोयीसाठी बांधिलकी

स्व. मोरोपंत पिंगळे यांची संकल्पना आणि कै. दादासाहेब जोग यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प आकाराला आला. ज्या गडावर पूर्वी वर्षाकाठी केवळ १० हजार पर्यटक येत होते, तिथे आज रोपवेमुळे लाखो शिवभक्त, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती सुरक्षितपणे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकत आहेत.

गैरसमज पसरवू नका: प्रशासनाचे आवाहन

शासकीय यंत्रणांनी रोपवेला झुकते माप दिले किंवा नियमबाह्य काम झाले, असे म्हणणे चुकीचे आहे. सर्व कामांची अधिकृत कागदपत्रे आणि परवानगीची पत्रे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. चुकीच्या बातम्यांमुळे शिवभक्तांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन रोपवे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT