अलिबाग: भारतीय प्रजासत्ताकाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास,मंत्री भरत गोगावले यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्य कार्यक्रमास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते.
यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अंमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.
यावेळी शुभेच्छा देतांना रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास,मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, आज आपण सर्व येथे भारताच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र व ऐतिहासिक प्रसंगी एकत्र आलो आहोत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, आज भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी येथे जमलेले स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, बंधू-भगिनी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी तसेच पत्रकार बंधू-भगिनीना व तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करतो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांना समजासुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि आपण लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उभे राहिलो. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही मूल्ये दिली आहेत. या महान कार्याचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावेळी अत्यंत आदराने स्मरण करणे आपले कर्तव्य आहे.
रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीचा साक्षीदार जिल्हा आहे. अशा ऐतिहासिक भूमीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करणे, हे आपले विशेष कर्तव्य आहे. मा.पतंप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरु झाला आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, कृषी, औद्योगिक विकास, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत सातत्याने भरीव काम सुरू आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि प्रशासनातील सर्व सहकारी अधिकारी-कर्मचारी रायगड जिल्ह्यात शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकारे काम करीत आहेत, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. या सर्व विकासकामांमध्ये जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
विविध पुरस्कार व सत्कार समारंभ
यावेळी श्री.विक्रम व्यंकटराव नवरखेडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक-2026 देवून सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्य केल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून राधाकृष्ण हरीगाराम बिशनोई, सिध्दार्थ ठाकूर, विजय सुरेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. मेरा युवा भारत, रायगड यांच्यामार्फत जलतरण क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल कुमारा सारा अभिजित वर्तक, रा.फोफेरी ता.अलिबाग हीचा सन्मान करण्यात आला. उप वनसंरक्षक अलिबाग यांच्याकडून उल्लेखनीय आणि गौरवास्पद कामगिरीबद्दल पोलीस निरिक्षक, वाहतुक शाखा अलिबाग अभिजीत भुजबल, पोलीस निरिक्षक, अलिबाग पोलीस ठाणे किशोर साळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अलिबाग वनपरिक्षेत्र नरेद्र शिताराम पाटील, वनपाल कार्ला तुकाराम रघुनाथ जाधव, वनपरिमंडळ, अलिबाग, अशोक महादेव काटकर, वनपाल, वावंजा वनपरिमंडळ, पनवेल या गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण अधिकारी (प्राथ.) यांच्याकडून जांबोरी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे रायगड जिल्ह्यातील कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली ता.खालापुर या शाळेतील 25 स्काऊट गाईड व 3 शिक्षक यांनी संचालनामध्ये केलेल्या उत्कुष्ट कामाबद्दल ट्रॉफि व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू ओंकार जितेंद्र पवार (कुस्ती), सार्थक मारुती इंद्रे (वॉटरपोलो), ऋषिकेश पुंडलीक मालोरे (वुशू), सलोनी पद्माकर मोरे (पॉवरलिफ्टिंग), अमृता ज्ञानेश्वर भगत (पॉवरलिफ्टिंग), अन्वी विक्रम राठोड (रायफल शूटिंग), प्रवीण खुटारकर (अॅ थलेटिक्स), सचिन शंकर माळी (वूशू मार्गदर्शक), अरविंद रावण शिंदे (अॅजक्रोबेटिक्स जिम्नॅस्टिक्स), श्रद्धा साईनाथ तळेकर (जिम्नॅस्टिक्स), श्रेयस दिपक पराडकर (जलतरण दिव्यांग), प्रमोद कुमार (टेबल टेनिस) यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर मंत्री श्री.गोगावले यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी संविधानाचे निष्ठेने पालन करू, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जपू, आणि रायगड जिल्ह्याच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देवू, अशी प्रतिज्ञा घेवू या. शेवटी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी पुन:श्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.