पेण : स्वप्नील पाटील
सहली-लग्नसमारंभा होणाऱ्या प्रासंगित करारांमध्ये एसटीच्या रायगड विभागाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रासंगिक करारांच्या 94 बसेसच्या माध्यमातून 36 हजार 577 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. यातून एसटीला सुमारे 25 लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्यान अनेक शैक्षणिक सहली आणि त्यातच लग्नसमारंभाचा सीजन असल्याने या दोन महिन्यात एसटीच्या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बुकिंग होत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड विभागाची एसटी प्रासंगिक कराराच्या माध्यमातून सुसाट धावत असून नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या रायगड विभागाच्या 94 बसेस बुक झाल्या आहेत.
या बुकिंगच्या माध्यमातून एसटीने महिनाभरात 36 हजार 577 किलोमीटर प्रवास करून प्रवाशांची तसेच विद्यार्थी आणि समारंभातील कुटुंबीयांची सेवा केली आहे. त्यामुळे खाजगी वाहनांपेक्षा एसटीच्या माध्यमातून आपला प्रासंगिक करार करून पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास यापुढे देखील प्रवाशांनी करावा असे आवाहन रायगड विभाग नियंत्रक डॉ सुहास चौरे यांनी प्रवाशांना केले आहे.
महाराष्ट्राला लाभलेली धार्मिक संस्कृती, गडकिल्ले आणि कोकण किनारपट्टीवर असणारी असंख्य पर्यटन स्थळे यामुळे अनेक शैक्षणिक सहली अशा ठिकाणी प्रामुख्याने जात असतात. त्यातच याच दरम्यान सुरू असणारे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी लांबचा आणि असंख्य प्रवाशांचा प्रवास असेल तर एकावेळी अनेक गाड्या नेण्यापेक्षा अनेक कुटुंब एसटी सोबत प्रासंगिक करार करून आपला सुखाचा प्रवास करत असतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या प्रासंगिक कराराच्या माध्यमातून रायगडाची एसटी सुसाट धावताना दिसत आहे.
नोव्हेंबर महिन्यात रायगड जिल्ह्यातील आठ आगारांच्या माध्यमातून एसटीच्या 94 गाड्या बुक झाल्या असून सवलतीच्या 54 तर विनासवलतीच्या 40 बसेस बुक झाल्या आहेत. तर या 94 बसेसने सवलतीच्या माध्यमातून 25 हजार 289 किलोमीटर आणि विनासवलतीच्या माध्यमातून 11 हजार 288 असा एकूण 36 हजार 577 किलोमीटरचा प्रवास केला आहे.
एसटीचे प्रासंगिक करारातील दर (कि.मी.मध्ये )
साधी बस 40 ते 45 आसन ः (दुहेरी वाहतूक 64 रु.), (एकेरी वाहतूक 96 रु.) निम आराम/शयन आसनी 40 ते 45 आसन ः (दुहेरी वाहतूक 77 रु.), (एकेरी वाहतूक 115 रु.) शयनयान 30 आसन ः (दुहेरी वाहतूक 70 रु.), (एकेरी वाहतूक 105 रु.) वातानुकूलित शिवशाही 40 ते 45 आसनी ः (दुहेरी वाहतूक 85 रु.), (एकेरी वाहतूक 128 रु.) वातानुकूलित 9 मीटर ई. बस 35 आसनी ः (दुहेरी वाहतूक 81 रु.), (एकेरी वाहतूक 121 रु.) वातानुकूलित 12 मीटर ई. बस 40 ते 45 आसनी ः ( दुहेरी वाहतूक 102 रु.), (एकेरी वाहतूक 153 रु.).
प्रासंगिक करारामुळे नागरिकांना दिलासा
परवडणारा खर्च, प्रतिव्यक्ती खर्च कमी, इंधन, चालक, मानधन, टोल, पार्किंग यांचा स्वतंत्र खर्च नाही अनुभवी चालक, नियमित वाहन तपासणी, सरकारी नियमांचे पालन, सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास कायदेशीर आणि विश्वास, सरकारी संस्था असल्याने फसवणूक नाही, परवानगी, विमा, फिटनेस सर्व कायदेशीर व अद्ययावत सर्वांना एकत्र नेण्याची सोय, एसटी वर्क शॉप आणि डेपो सर्वत्र असल्याने तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा जलद मिळते, खाजगी वाहन बिघडल्यास पर्यायी वाहन मिळणे कठीण प्रवाशांसाठी विमा संरक्षण उपलब्ध, अपघात, अडचणी, जबाबदारी ठरलेली असते अधिकृत दरसूची, पावती व करारपत्र, ऑनलाइन तसेच डेपोवार सोपा करार असतो.
खाजगी वाहनांपेक्षा सरकारी संस्था असणाऱ्या आणि गरिबांच्या खिशाला परवडणाऱ्या एसटीचा प्रवास हा प्रवाशांच्या दृष्टिकोनातून नेहमीच फायदेशीर ठरला आहे. एखादी सहल किंवा लग्नसमारंभासारखा एखादा कौटुंबिक कार्यक्रम असेल तर त्यासाठी देखील एसटीचा अधिकृत आणि पारदर्शक करार करून एसटीचाच प्रवास करावा. आपला सुखकर तसेच आर्थिक बचत करून प्रवास करावा.डॉ. सुहास चौरे, विभाग नियंत्रक, रायगड