Raigad Rain Pudhari File Photo
रायगड

Raigad Rain: रायगड जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात; जूनच्या पहिल्या १० दिवसांत केवळ ३.८ टक्के पाऊस

१० जून पर्यंतच्या पर्जन्य अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप गती घेतलेली नाही

पुढारी वृत्तसेवा

रायगड: रायगड जिल्ह्यात यंदा पावसाची सुरुवात अत्यंत संथ झाली आहे. १० जून पर्यंतच्या पर्जन्य नोंदीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ ८.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण एकूण सरासरीच्या (२१८.६ मिमी) तुलनेत अवघे ३.८ टक्के इतकेच आहे.

गेल्या वर्षी सन २०२५ मध्ये याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७४.२ मिमी (३३.९ टक्के) पाऊस झाला होता, त्याच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.

तालुकावार पावसाची स्थिती

१० जून पर्यंतच्या पर्जन्य अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप गती घेतलेली नाही. मुरुड, श्रीवर्धन आणि म्हसळा या किनारपट्टीच्या भागात इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीसा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २५.७ मिमी पाऊस मुरुड तालुक्यात नोंदवला गेला आहे, जो सामान्य पावसाच्या १२.९ टक्के आहे. म्हसळा तालुक्यात २३.७ मिमी (९.१ टक्के) तर श्रीवर्धन तालुक्यात १८.१ मिमी (७.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

तळा तालुक्यात १६.१ मिमी (६.४ टक्के) आणि पोलादपूर तालुक्यात ११.७ मिमी (४.८ टक्के) प्रगतीशील एकूण पाऊस झाला आहे. महाडमध्ये ११.६ मिमी (५.१ टक्के) तर रोहा तालुक्यात ९.१ मिमी (३.९ टक्के) पाऊस पडला आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यात ६.४ मिमी (३.४ टक्के) आणि माणगाव तालुक्यात ८.३ मिमी (३.७ टक्के) नोंद झाली आहे.

पनवेल तालुक्यात आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे अवघा १.२ मिमी (०.७ टक्के) पाऊस झाला आहे. याशिवाय कर्जत (२.९ मिमी), खालापूर (५.३ मिमी), उरण (५.८ मिमी), सुधागड (३.८ मिमी) आणि पेण (२.० मिमी) या तालुक्यांमध्येही पावसाची टक्केवारी ३ टक्क्यांच्या आतच आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या १० दिवसांत अलिबाग (११२.९ मिमी), उरण (१०४.७ मिमी), रोहा (११२.५ मिमी) आणि तळा (१०६.३ मिमी) या भागांत चांगला पाऊस झाला होता. मात्र, यंदा या सर्वच भागांत पावसाने अद्याप म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही.

एकूणच संपूर्ण कोकण विभागाचा विचार केला तर विभागात आतापर्यंत सरासरी ३९.५ मिमी (१७.९ टक्के) पाऊस झाला आहे, ज्यामध्ये रायगड जिल्ह्याची सरासरी (८.४ मिमी) बरीच खालावलेली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवला असला, तरी सध्याच्या संथ सुरुवातीमुळे बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT