कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने शहराला लागून असलेल्या उल्हास नदीला पूर आला आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पुराचे पाणी शहराच्या सखल भागात शिरले आहे. यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
नदीकडील पूर्वेला असलेल्या बामच्या मळ्यात मोठ्या प्रमाणत पाणी शिरले होते.त्यानंतर गणपती घाटाजवळील बाजारपेठेत तसेच मधली बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणांत पाणी आले होते. एकीकडे नदीपात्रातील पाणी शहरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यात पावसाची संततधार कायम होती. बाजारपेठेतील सखल भागातील दुकानामध्ये पाणी शिरल्याने व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले आहे. कोतवाल नगरमधील विशाल अपार्टमेंट मध्ये तळमजल्यावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी आल्याने येथील नागरिकांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुद्रे खुर्द येथील नानामास्तर नगरमध्ये सुखम हॉस्पिटल परिसरात पाणी साचले होते. तसेच मालवाडी येथील नाला तुडुंब भरल्याने तो ओव्हरफ्लो होऊन परिसरातील बिल्डिंगमध्ये एक फुटापर्यंत पाणी शिरले होते.
जुलै 2021 मध्ये आलेल्या पुरामध्ये कर्जत मधील अनेक नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुद्रे येथील नागरिकांनी आपली चार चाकी वाहने रेल्वे ब्रीजच्या साईड पट्टीवर पार्क केल्या होत्या. कर्जत न.प.ने पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहराची नाले सफाई न केल्याने शहरातील गटारे कचर्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होऊन काही भागात मोठ्या प्रमाणत पाणी तुंबलेले चित्र दिसत होत. मुद्रेश्वर मंदिर आणि अग्निशामक वाहन तळ येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. सांडसी गावातील रस्त्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतुकीचा रस्ता बंद होता. तसेच नेरळ येथील दहिवली पुलावरून मोठ्या प्रमाणांत पाणी वहात असल्याने येथील 25 गावांचा संपर्क तुटला होता. या महिन्यात जवळ जवळ तीन वेळा पुलावरून पाणी जाण्याची घटना घडली आहे. तर रेल्वे ट्रॅक वर पाणी आल्याने रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प होती.
रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हाधिकारी रायगड यांचे शाळा, महाविद्यालय बंदचे आदेश सकाळी उशिरा प्राप्त झाल्याने काही पालकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. तर हवामान विभागाने पुढील 24 तासांत रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे असे अहवान कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी नागरिकांना केले आहे. तर या मुसळधार पावसामुळे विजेचे खांब आणि विद्युत वाहक तारा तुटल्याने शहराचा तसेच तालुक्यातील काही भागाचा वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.
मालवाडी येथे जोरदार पावसामुळे नदीच्या बाजूला कळंबोली फिडरचे पोल व कंडक्टर तुटून पडले असून, उल्हास नदीला प्रचंड पाणी आले असल्यामुळे त्या ठिकाणीं जाता येत नसल्याने खांडपे फिडर, येसिपी फिडर, भोईवाडी वरील गावांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच 22 केवी कळंबोली ते कर्जत येणारी इनकमर लाइन चा एक पोल मौजे वावे येथे पडला होता. पूर परिस्थिती असल्याने महावितरण कर्मचार्यांना काम करणे कठीण झाले असल्याचे कर्जत महावितरणचे उप अभियंता प्रकाश देवके यांनी सांगितले.
2021 च्या महाप्रलयाच्या आठवणी महाडकरांच्या ताज्या असतानाच सावित्रीने आज अखेर सर्व बंद झुगारून महाड शहरात सकाळी पावणेसहाच्या सुमारात प्रवेश केला असून महाड शहरांमध्ये येणार्रया पाच पैकी तीन वाटांवर या नदीच्या पाण्याने नागरिकांना मार्गावरून परावर्तन केले आहे. महामार्गावर शहरांतील विविध नागरिकांनी आपल्या मोठ्या गाड्या नेऊन ठेवल्याने या मार्गावरून ही वाहतूक करणे अडचणीचे झाल्याचे दिसून येते एका परीने सावित्री नदीतील आलेल्या या महापुराच्या पाण्याने महाड शहराची तीन दिशेकडून कोंडी केल्याचे चित्र अनुभवास येत आहे.
गेल्या 24 तासापासून महाड परिसरात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सद्यस्थितीमध्ये महिकावती मंदिराजवळ नदीची पाण्याची पातळी 6.50 पेक्षा जास्त नोंदविण्यात आली आहे. सर्व महाडकर नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन नगरपरिषद व स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. शहरात कोणत्याही क्षणी सुकट गल्ली परिसरात तसेच सखल भागात पाणी शिरले होते.