Raigad Rain Update | रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

महाड, रोहा, नागोठणे, पाली, कर्जतला महापूराची स्थिती
Raigad Rain Update
रायगड मधील रोहा शहरात पाणी शिरल्याने रोहा जलमय झाले. pudhari photo

रायगड : गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या धुवाँधार पावसामुळे रायगड जिल्हयात हाहाकार उडाला आहे. महाड, रोहा, नागोठणे, पाली, कर्जतला महापूराची स्थिती आहे. जिल्हयातील सावित्री, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची तर पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. महाड, रोहा, नागोठणे शहरासह अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठिकठिकाणी घरे, शाळा इमारती, वाहने यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

जिल्हयातील मंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. अतिवृष्ठीमुळे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चोवीस तासापासून धुवाँधार

रायगड जिल्हयात गेल्या चोवीस तासापासून धुवाँधार पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस कर्जतमध्ेय (231 मिमी) नोंदविण्यात आला आहे. सुधागड, पोलादपूर, पेण, खालापूर, अलिबाग, महाड, उरण, रोहा या तालुक्यांमध्ये वादळी वार्‍यासह पाऊस झाला आहे. जिल्हातील अनेक ठिकाणी पुरामुळे नैसर्गिक आपत्तीची स्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील बोरघर येथील 1 व्यक्ती वाहून गेली असून सदर मृतदेह रामराज नदीला दापोल खाडी येथे सापडून आला आहे. मृत व्यक्तीचे कमलाकर धर्मा म्हात्रे असे आहे.

कुसुंबळे, चौल उत्तर भाग (जाखमाता), दळवी -खरोशी, सहाण, श्रीगाव, वैजाळी, उत्तर भोवाळे, भागात घरांच नुकसान, झाडे पडणे, वीज खांब पडणे अशा घटना घडल्या आहेत. पेण घरांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुरुडमध्येही घरांचे नुकसान झाले आहे. पनवेल तालुक्यात पुलावरुन पाणी जात असल्याने तुरमाळे वाहतूक रस्ता बंद करण्यात आला आहे.

नागोठणे ते वरवठणे पूल पाण्याखाली

सुधागडात पाली ते वाकण रोडवरील अंबा नदीचे ब्रीज चे दोन्ही बाजूस रोडवरून पाणी जात आहे, खबरदारी म्हणून पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पुलाला पाणी लागले असल्याने सदर पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नागोठणेला पुराचा वेढा पडला आहे. नागरीकांना स्थलांतरीत करणेचे काम चालू आहे.

नागोठणे ते वरवठणे पूल पाण्याखाली गेला आहे. नागोठणे बस स्टॅड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोळीवाडा परिसरात पाणी भरले असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. माणगाव- तळा तालुक्यातही घर आणि इमारतींची नुकसानी आहे. ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पुणे-कोलाड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. महाड तालुक्यातही काही भागात पूरस्थिती आहे. दस्तुरी नाका ते नातेखिंड रोडवर पाणी भरले आहे. कसबे शिवथर कडून सह्याद्री वाडीकडे जाणारा पूल तुटला आहे. पाचाड येथे भूस्खलन झाले आहे. दादली पुल हा जड वाहनाकरिता बंद केला आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पोलादपूर तालुक्यातही घरांची मोठ्या प्रमाणात पडझड व विजेचे पोल पडले आहेत. म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात शाळा इमारती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाच्या माहितीप्रमाणे जिल्हयातील प्रमुख रस्ते व रेल्वे वाहतूक सुरळीत सुरु आहे. पुरग्रस्त भागातील नागरीकांना स्थलांतरीत करणेचे काम चालू आहे. सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असून सद्यस्थितीत आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्तीची परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करु नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

-किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

मंत्री आदिती तटकरे यांनी नागोठणे तेथे, आमदार भरत गोगावले यांनी महाड, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागोठणे येथील पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या. त्यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी आपत्तीग्रस्त भागांना भेटी देऊन तेथे मदत कार्याचा आढावा घेतला.

148 घरात घुसले पाणी

पोलादपूर 25, म्हसळा 10, श्रीवर्धन 1, अलिबाग 12, पेण 3, मुरुड 3, पनवेल 7, महाड 15, माणगाव 10, तळा 4, नागोठणे 15, रोहा 25, खालापूर 5, सुधागड 10, कर्जत 3 अशा एकूण 148 घरांमध्ये पाणी घुसले आहे. मागील 24 तासांत अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात अंशत व पुर्णत अशा 71 घरांचे नुकसान झाले आहे.

आजही शाळा बंद राहणार

अतिवृष्टी आणि पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर 25 जुलै आणि 26 जुलै या दोन दिवस रायगड जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविदयालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जेएसडब्ल्यूचे जहाज समुद्रात भरकटले

गुरुवारी आलेल्या मोठ्या सागरी उधाणात अलिबाग समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले आहे. त्यावर असलेल्या 14 खलांशांना वाचवण्याकरिता रायगड पोलीस व कोस्टगार्डच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती े अपर जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्याच्या मागील समुद्रात हे भरकटलेले जहाज आता आहे. उधाणाची भरती ओसरत आहे. ती ओसरल्यावर रात्रीच या खलाशांना बाहेर काढण्याकरीती रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले आहे. रात्री शक्य झाले नाहीच तर उद्या सकाळी हेलिकॉप्टर रेस्कू करुन खलाशांना बाहेर काढण्यात येईल.

310 कुटुंबाचे स्थलांतर

कर्जत तालुक्यातील घरांचे नुकसान असून दहिवली तर्फे वरेडी येथील उल्हास नदीचे पाणी वाढल्याने पुलावरून पाणी वाहु लागले असल्याने दोन्ही बाजूची वाहतुक बंद करण्यात आली आहे. शेलु बांधिवली येथील नदीची पातळी वाढल्या कारणाने 310 कुटुंब व 1275 लोकांना सुरळीत ठिकाणी स्थलांतरित केलेले आहे. धामोते नाला नजीक 6 कुटुंब लोकसंख्या 35 यांना गावातील मंदिर येथे स्थलांतरित केलेले आहे. खालापूरातही घरांचे नुकसान आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news