Raigad Rain
महाड तालुक्यांतील खाडीपट्टा विभागातून जाणार्‍या महाड-म्हाप्रळ या रस्त्यावर रावढळ ते तुडील या टप्प्यात आलेले पूराचे पाणी दिसत आहे. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. pudhari photo
रायगड

Raigad Rain | खाडीपट्टयात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा
खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी गुरुपौर्णिमेला सातत्य राखल्याने खाडीपट्टयात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. खाडीपट्टयातुन जाणार्‍या महाड-म्हाप्रळ या मुख्य रस्त्यावर रावढळ ते तुडील दरम्यान रस्त्यावर पाणी चढल्याने त्यापुढील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला होता. खाडीपट्टीत पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

हवामान खात्याने दिलेल्या सूचनेप्रमाणे अतिवृष्टी होऊन खाडीपट्टयामध्ये ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सुमारे 25 ते 30 गावांचा महाडशी संपर्क तुटला होता. तीन जिल्ह्यांना जोडणारा खाडीपट्टयातील मुख्य रहदारीच्या महामार्गावरील महाड-म्हाप्रळ रस्त्यावरील रावढळ फाटा ते तुडील फाटा दरम्यान रस्त्यावरुन पुराचे पाणी रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून वाहू लागले तर सायंकाळी पुराच्या पाण्यामध्ये वाढ झाल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठीच बंद झाला होता. त्यामुळे महाड शहरामध्ये कामानिमित्ताने आलेले कामगार, मजूर अडकून पडले होते.

एकंदर अतिवृष्टीमुळे वारंवार महाड-म्हाप्रळ रस्ता पुरामध्ये लुप्त होत असून गेले अनेक वर्ष हा असलेला त्रास लक्षात घेऊन प्रशासन यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे दरवर्षी अनेक वेळा पूर येऊन हा रस्ता बंद होऊन 25 ते 30 गावांचा संपर्क तुटतो. या मार्गावरील रावढळ पुलाची उंची वाढविल्यास लगतच्या रस्त्याची देखील उंची वाढेल. मात्र हे काम तत्परतेने होणे गरजेचे आहे. त्यामुळे कायमचा पुराचा वनवास खाडीपट्टा वासियांचा निघून जाईल असे स्थानिकांनी सांगितले.

भातशेती पुराच्या पाण्याखाली

खाडीपट्टयातील सावित्री नदी लगत असलेल्या गावांमध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण होऊन भात शेती देखील पुराच्या पाण्याखाली होती. प्रशासनाने केलेल्या सूचनेचे नागरिकांनी पालन करून पुराच्या पाण्यामध्ये जाण्यास टाळले आहे. मात्र पुराचे पाणी हौसेने बघण्यास तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

पुराचे पाणी घरांमध्ये घुसण्याची शक्यता

खाडीपट्टयामध्ये मोठ्या प्रमाणात दरडग्रस्त गावे आहेत. शनिवारी, रविवारी झालेल्या अतिवृष्टीमध्ये पुराचे पाणी काही गावांमध्ये घरांमध्ये घुसू शकते याचा अंदाज घेऊन प्रशासनाच्या तलाठी, ग्रामसेवक यांनी या ग्रामस्थांना सूचना केल्या आहेत. तर रावढळ कोसबी येथील नदी लगत असलेल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता असून रावढळ हायस्कूल येथील वर्गांमध्ये निवारा घेण्यासाठी नागरिकांना तेथील प्रशासनाने सूचना केल्या असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

SCROLL FOR NEXT