Raigad Eye Donation Pudhari
रायगड

Raigad Eye Donation: रायगडात मरणोत्तर नेत्रदानातून 41 अंधांना नवी दृष्टी; माणुसकीचा उज्ज्वल आदर्श

पावणेपाच वर्षांत जिल्ह्यात 147 जणांचे नेत्रदान; ‘मरणानंतरही जगण्याची’ संवेदनशील भावना ठरते प्रेरणादायी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

‌‘संपलो जरी मी, तरी कुणाच्या नजरेत अजून जगतो मी” ही उदात्त मानवी भावना प्रत्यक्षात आणण्याचा एकमेव शाश्वत मार्ग म्हणजे मरणोत्तर नेत्रदान! मरणानंतरही दुसऱ्यासाठी जगण्याची ही आस रायगड जिल्ह्यातील नागरिक मरणोत्तर नेत्रदानातून पूर्ण करीत आहेत. अशा नेत्रदात्यांमुळे 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2025 या पावणेपाच वर्षात 41 दृष्टिहीनांना सृष्टीचे नितांतसुंदर दर्शन घडले.

माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे नेत्र काही तास जिवंत असतात. मृत्यूनंतर काही तासांत काढलेल्या नेत्रांचा अंधत्व आलेल्यांना फायदा होऊ शकतो. हे जग पुन्हा पाहता येऊ शकते. नेत्ररोपण यशस्वी झालेल्या व्यक्तीला 60 टक्के दिसू शकते. नेत्रदानासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून सहा तासांच्या आत डोळ्यातील नेत्रपटल काढून घेणे आवश्यक असते. या डोळ्यांचे दोन ते तीन दिवसांमध्ये रोपण होणेही आवश्यक असते. नेत्ररोपणामध्ये बुबुळाच्या पाठीमागे असलेल्या ‌‘कॉनिर्या‌’ या भागाचे रोपण केले जाते.

नेत्रदानाचे वाढते प्रमाण

रायगड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नेत्रदानाबद्दल चांगली जनजागृती होत आहे. वर्षाला सुमारे 300 नागरिक मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करीत आहेत. त्यामुळे अशा नेत्रदानाचे प्रमाणही वाढले आहे. 1 एप्रिल 2021 ते डिसेंबर 2025 या पावणेपाच वर्षात जिल्ह्यात 147 जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. यामधून 41 अंधांवर बुबुळ रोपण शस्त्रक्रिया करून नवी दृष्टी देण्यात आली. तर उर्वरित जणांचे नेत्रपटल संशोधनासाठी पाठविण्यात आले आहेत.

असे झाले नेत्रदान

1 एप्रिल 21 ते 31 डिसेंबर 25 या कालावधीत रायगड जिल्ह्यात 147 जनानी मरणोत्तर नेत्रदान केले. (294 नेत्र बुबुलांचे संकलन ) जिल्हा रुग्णालयात 88 नेत्र बुबुळे संकलन (44 जणांचे नेत्रदान ) , शंकर आय बँक 16 नेत्र बुबुळे संकलन ( 8 नेत्रदान ) , लक्ष्मी आय बँक 190 नेत्र बुबुळे संकलन (80 जणांचे नेत्रदान ), शस्त्रक्रिया 41 , संशोधन 116 , इतर संस्थेत पाठवलेले नेत्र बुबुळ 6

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT