महाड ः श्रीकृष्ण बाळ
सुमारे चार वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर निवडणूक आयोगामार्फत झालेली सुरुवात ही राजकीय पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांकरता नवी संधी देणारी असली तरीही मागील काही वर्षात महाड-पोलादपूर तालुक्यात व रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या विविध राजकीय पक्षांतील मोठ्या बदलामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होईल असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.
सद्यस्थितीमध्ये महाड तालुक्यात महायुतीचा मोठ्या प्रमाणात बोलबाला आहे मात्र महायुती अंतर्गत निर्माण झालेला वाद हा आगामी निवडणुकीपर्यंत तरी शमेल असे कोणतीही शक्यता दिसत नसल्याने या निवडणुकीदरम्यान महायुतीमध्येच मोठ्या प्रमाणात लढती होतील अशी भीती राजकीय कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
विरोधी पक्षांमध्ये असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस- उद्धव ठाकरे शिवसेना- भारतीय काँग्रेस- शेतकरी कामगार पक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची महाड पोलादपूरमध्ये असलेली अल्पशी ताकद ही निवडून येणाऱ्या संबंधित राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीकरिता मौल्यवान ठरणार आहे.
महाविकास आघाडी संघटित रित्या महाडसह रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्याचे चित्र आजपर्यंत दिसून आलेले नाही. लोकसभा व विधानसभेतील दारुण पराभव स्वीकारून त्यातून पुन्हा भरारी बांधण्याकरता महाविकास आघाडीच्या महाडसह रायगड जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गस्थ करणे आवश्यक होते मात्र निवडणुका आता शेवटच्या घटकेपर्यंत पोहोचल्यानंतर देखील या संदर्भात कोणतीही सकारात्मक हालचाल होत नसल्याचे दिसून आल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ लढतीचा असलेला अंदाज आगामी काळात राजकीय घडामोडींमुळे शक्य नाही.
महायुतीमधील असलेल्या तीन प्रमुख पक्ष आगामी काळात कोणती भूमिका घेतात हे पाहणे भवितव्यातील महाड परिसरातील तसेच रायगडातील राजकीय अस्तित्यंतरे घडवणारे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये सध्या सुरू असलेला जिल्ह्यातील जोरदार संघर्ष आता स्थानिक पातळीवरती स्पष्टपणे जाणवू लागला आहे. यामध्येच भारतीय जनता पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या नात्या मार्गाने आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न या तिन्ही पक्षांकडून साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून केले जातील अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीमध्ये महायुती मधीलच असलेला सावळा गोंधळ व राष्ट्रवादी व शिवसेनेमधील झालेली मत विभागणी निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातून दिसून येणार का असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे .एकूणच महायुतीमधील अंतर्गत असलेला वाद आता निवडणुकीच्या निमित्ताने सर्व जनतेसमोर पुन्हा एकदा येणार असून यामुळेच महाड सह रायगड जिल्ह्यात राजकीय संघर्ष तीव्र होईल असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत.
महायुतीमधील अंतर्गत असलेला वाद आता निवडणुकीच्या निमित्ताने सर्व जनतेसमोर पुन्हा एकदा येणार असून रायगड जिल्ह्यात राजकीय संघर्ष तीव्र होईल असे स्पष्ट संकेत आहेत.