Child Labour Rescue Pudhari
रायगड

Child Labour Rescue: वेठबिगारीच्या जोखडातून झाली मुक्तता; म्हसळ्यातील चार मुले घरी परतली

रायगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रोजगारासाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना ओलीस ठेवून त्यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाच्या तावडीतून रायगड पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांची सुखरूप मुक्तता केली आहे. म्हसळा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत ही धडाकेबाज कारवाई केली.

म्हसळा तालुक्यातील तोराडी येथील रहिवासी प्रकाश किसन वाघमारे आणि त्यांची पत्नी सुनीता वाघमारे हे आपल्या चार मुलांसह पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदे येथील नामदेव रानवडे यांच्या वीटभट्टीवर कामासाठी गेले होते.

काम करत असताना मालक नामदेव रानवडे याने वाघमारे दाम्पत्य पळून जाऊ नये या उद्देशाने त्यांच्या चार मुलांना वीटभट्टीवर अडवून ठेवले होते. मालकाच्या सततच्या जाचाला कंटाळून हे दाम्पत्य नाईलाजास्तव आपल्या मुलांना तिथेच सोडून गावी पळून आले होते.

मुलांना पाहताच पालक आनंदित पोलिसांची त्वरित कारवाई

या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने क्षणाचाही विलंब न करता पुणे जिल्ह्यातील संबंधित ठिकाणी धाव घेतली.

पोलिसांनी तेथून 9 ते 15 वर्षे वयोगटातील चारही मुलांची सुटका करून त्यांना आई सुनीता वाघमारे यांच्या स्वाधीन केले. मुक्त करण्यात आलेल्यांमध्ये सुरज प्रकाश वाघमारे (15 वर्षे) राहुल प्रकाश वाघमारे (13 वर्षे) , मनोज प्रकाश वाघमारे (11 वर्षे), अश्विनी प्रकाश वाघमारे (9 वर्षे) यांचा समावेश आहे.मुलांना पाहूनआई,वडिलांच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. पोलिसांनी वीटभट्टी मालक नामदेव रानवडे याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

नागरिकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत: रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जाताना ग्रामपंचायत किंवा पोलीस पाटील यांच्याकडे कुटुंबाची नोंदणी करा.

कामावर जाताना आधारकार्ड सोबत ठेवा आणि मालक किंवा मुकादमाचा पूर्ण पत्ता व फोन नंबर नातेवाईकांना द्या,मुलांना कामाच्या ठिकाणी नेण्याऐवजी शासनाच्या हंगामी वसतिगृहात ठेवण्याचा प्रयत्न करा. अन्यायाविरुद्ध आवाज उठवा: पगार रोखणे, मारहाण करणे किंवा ओलीस ठेवणे हा वेठबिगारी अंतर्गत गुन्हा आहे. अशा वेळी घाबरून न जाता 100, 112 किंवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT