पोलीस भरतीत ‘मुन्नाभाईं’ना मदत करणार्‍यांचा शोध सुरू Pudhari File Photo
रायगड

Raigad Police Recruitment | पोलीस भरतीत ‘मुन्नाभाईं’ना मदत करणार्‍यांचा शोध सुरू

सहा उमेदवारांवर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड पोलीस विभागाच्या पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेच्या वेळी कानामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लावून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार्‍या सहा उमेदवारांवर अलिबाग आणि पेण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या उमेदवारांना मदत करणार्‍यांचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरु केला असून तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

रायगड जिल्ह्याची पोलिस भरती प्रक्रिया 21 जूनपासून सुरू झाली आहे. 382 पोलिस कॉन्स्टेबल, 9 बँड्समन व 31 चालक कॉन्स्टेबल अशा एकूण 422 पदांसाठी जिल्हा पोलीस दलात ही भरती आहे. नुकतीच मैदानी चाचणी पार पडली आहे. यातील पात्र उमेदवारांची शिपाई पदाची लेखी परीक्षा 10 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. शनिवारी अलिबाग तालुक्यातील सात आणि पेण तालुक्यातील चार केंद्रावर ही परीक्षा झाली. या लेखी परीक्षेकरीता एकुण पुरूष 3572 व एकुण महिला उमेदवार 1175 असे एकुण 4747 असे उमेदवार उपस्थित होते. या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थांना परीक्षा केंद्रात प्रवेश देत असतांना त्यांना तपासले असता रामदास जनार्दन ढवले (वय 23, बीड), दत्ता सुभाष ढेंबरे (वय 22, बीड), ईश्वर रतन जाधव (वय 21, जालना), गोरख गंगाधर गडदे (वय 24, बीड), सागर धरमसिंग जोनवाल (वय 20 वर्षे. औरंगाबाद), शुभम बाबासाहेब कोरडे (वय- 27, जि. बीड) अशा सहा जण अलिबाग व पेण परीक्षा केंद्रावर कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस टाकून परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या उददेशाने मिळून आले होते. या उमेदवारांवर अलिबाग आणि पेण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील पेण येथील उमेदवार हा रा. संभाजीनगर येथील साथीदाराशी संपर्कात होता. त्याच बरोबर अन्य उमेदवार कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरु करण्यात आला असून तीन पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी दिली.

दरम्यान, पोलीस दलात दाखल होण्यासाठी उमेदवारांकडून होणारा गैरप्रकार उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहेे. गैरमार्गाचा अवलंब करून पोलीस दलात दाखल होण्याच्या प्रयत्नाला रायगड पोलीसांनी चाप बसविला आहे. त्यामुळे मैदानी चाचणीतही या उमेदवारांनी गैरप्रकार केले आहेत का याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT