अलिबाग : रमेश कांबळे
रायगडमधील डिझेल तस्करीवर पोलिसांची नजर असून, गेल्या पाच वर्षात बारा कारवाया करीत ९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अलिबाग तालुका हा मुंबई पासून समुद्रमार्गे अगदी जवळचा तालुका असल्याने रायगड जिल्ह्यात डिझेल तस्कर हे काही राजकीय पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याने मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. मात्र रायगड पोलिस दलाला त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे.
डिझेल तरकारी कसमुद्रातील बोटीमधून तेलाची चोरी करण्याआधी भारतीय तसेच परदेशी मालवाहतूक जहाजाच्या कॅप्टन बरोबर हातमिळवणी करून हजारो लिटर डिझेल विकत घेऊन ते डिझेल रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि उरण तालुक्यातील समुद्रकिनारपट्टीवर असणाऱ्या जहाजमालक यांना तीस ते पस्तीस टक्के कमी दरात विक्री करीत आहेत. या विक्रीतून डिझेल तस्करी करणारे हे आठवड्याला जवळपास पाच ते सहा कोटी रुपये कमवत आहेत.
डिझेल तस्करी करीत असताना स्थानिक राजकीय पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याने डिझेल व्यवसाय सुरू आहे. डिझेल तस्करी बाबतची माहिती रायगड जिल्हा पोलिस दलाच्या गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आल्या आहेत. व्यवसायासाठी राजकीय वरदहस्त मिळाल्याने हा बेकायदेशीर व्यवसायासाठी रायगडच्या किनारपट्टीवर खास डिझेल तस्करांनी अड्डे केले आहेत. या तस्करी करणाऱ्यांना जिल्ह्यातील काही गुन्हेगार प्रवृत्ती असणारे स्थानिक नागरिकांची सुद्धा त्यांना मदत होत आहे. कांदळवनात सहसा कोणाचेही लक्ष जाणार नाही, अशा ठिकाणी डिझेल तस्करांचे अड्डे असून याच ठिकाणी डिझेलमध्ये भेसळ करणे, मच्छीमार नौकांना कमी दरात विकणे, जहाजातून चोरलेला माल लपवून ठेवणे आदी कामे केली जातात. रणच्या करंजा, रायगड जिल्ह्यातील रेवस, बोडणी, भाल या ठिकाणी हे छुपे अड्डे तयार केले आहेत. पावसाळ्यात उधाणामुळे हा धंदा काही दिवस बंद असतो, त्यानंतर पुन्हा जोमात सुरू होतो. समुद्र किनाऱ्यापासून काही नॉटिकल अंतरावर असलेल्या समुद्रात मोठमोठ्या जहाजातील डिझेल काढून कमी दरात मच्छीमारांना विकणारे मोठे रकेट रायगडच्या किनारपट्टीवर कार्यरत असल्याचे काही महिन्यांपासून होत आहे. जहाज मालकांनी तक्रार केल्यावर तात्पुरत्या स्वरूपात लुटमारीवर कारवाई केली जाते.
रायगड तस्करी बाबतची माहिती मिळाल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिस दल सज्ज आहे. तसेच पावसाळ्यात पोलिसांच्या बोटी बंद असल्याने सागरी गस्त बंद असली तरी सागर किनारी पोलिस गस्त सुरू आहे. तसेच समुद्रात सागर सुरक्षा दल यांची गस्त सुरू आहे.
- अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक. रायगड