पनवेल : पोलिस कर्मचारी दिलेला बंदोबस्त किंवा सोपवलेली जबाबदारी चोख निभावतात की नाही हे यापुढे जीपीएस ट्रॅकद्वारे वरिष्ठ अधिकार्यांना त्वरित कळणार आहे. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून इतरत्र थांबण्याचे प्रकार टाळण्यासह बंदोबस्तामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येते का? हेही या माध्यमातून पडताळले जाणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम हाती घेतला असून, महिन्याभरात तो पूर्ण ताकदीने राबवला जाणार आहे.
पनवेल परिसराचा होणार्या विकासाच्या तुलनेत पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ आहे. परिणामी गुन्हेगारांचा शोध घेणे, रोजचे बंदोबस्त यांचे नियोजन करताना अधिकार्यांना झळ बसते. त्यातच काही कर्मचारी दिलेला बंदोबस्त चोखरित्या न बजावता भलत्याच ठिकाणी बसलेले असतात. याचा परिणाम गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या कामावरही होतो. रस्त्यावर पोलिस दिसले तरीही अनेकदा गुन्हेगारी कृत्याला आळा बसतो. हीच परिस्थिती वाहतूक पोलिसांच्या बाबतीतदेखील आहे. अनेकदा गुन्हेगारांच्या मागावर राज्यभरात किंवा राज्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षेचाही प्रश्न गंभीर असतो. ते नेमके कोणत्या ठिकाणी व कोणत्या अवस्थेत आहेत याचीही क्षणाक्षणाची माहिती थेट पोलिस आयुक्तालयात नोंद होणार आहे असे सांगण्यात आले आहे.