रायगड : जयंत धुळप
ब्रिटीश सरकार देशात असताना त्यांनी जूलूम केला, अत्याचार केले अशी बाजू प्रकार्षाने सांगीतली जाते, तशी नोंद इतिहासात देखील आहे. परंतू त्यांच वेळी ब्रिटींशांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या असून, ते स्थानिकांच्या श्रद्धेच्या आड कधी आले नाहीत. याचीच आठवण देणारा तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड पोलिस मुख्यालयातील तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या मान्यतेने स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1898 मध्ये सुरु झालेला गणेशोत्सव यंदा आपले 127 वे वर्ष साजरे करित आहे.
लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतूनच हा रायगड पोलीस मुख्यालयातील गणेशोत्सव सुरु झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे. तत्कालीन कुलाबा संस्थान ब्रिटीशांनी बरखास्त केल्यामुळे सन 1840 मध्ये कुलाबा मध्यवर्ती पोलीस मुख्यालयाची निर्मिती झाली.
1840 मध्ये कुलाबा मध्यवर्ती पोलीस मुख्यालयाची निर्मिती झाल्यानंतर, गणेशोत्सव कालावधीत सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी गणेशोत्सव बंदोबस्त कर्तव्यावर हजर राहावे लागत असे. कोणालीही आपल्या घरच्या गणपतीला जाता येत नसे. यातून काहीशी रुखरुख तत्कालीन कुलाबा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये असल्याची जाणीव काही ब्रिटीश अधिकार्यांना झाली. या रुखरुखीतून कर्तव्यावरिल अधिकारी व कर्मचारी यांची मानसीकता अस्वस्थतेची असल्याचेही लक्षात आले होते.
त्याच सुमारास लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे आवाहन केले होते. त्याच आवाहनास प्रतिसाद देत तत्कालीन ब्रिटीश सरकारकडे कुलाबा पोलीस मुख्यालयात गणेशोत्सवास परवानी मिळावी असा प्रस्ताव दिला असता, त्यास मान्यता मिळाली होती. त्यानुसार सन 1898 पासून तत्कालीन कुलाबा पोलीस मुख्यालयात सार्वजनीक गणेशोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर कुलाबा जिल्ह्याचे रुपांतर रायगड जिल्ह्यात झाले. आज सन 2025 मध्ये 127 वा गणेशोत्सव विद्यमान रायगड पोलीस मुख्यालयात संपन्न होत आहे.
जुन्या ऐतिहासिक परंपरा आजही अबाधीत
सन 1898 मध्ये सुरु झालेल्या रायगड पोलीस मुख्यालयातील गणेशोत्सवा व्यतिरिक्त आजही मुख्यालयात विजयादशमीच्या दिवशी आपट्याचे सोने लुटणे, शस्त्रपुजन, होलीकोत्सव, नारळी पौर्णिमा व दहिहंडी हे उत्सव पारंपारीक पध्दतीने साजरे होतात. जुन्या परंपरा आजही अबाधीत राखण्यात येत असल्याचे इतिहास संशोधक आणि रायगड पोलीस दलातील पोलीस उप निरिक्षक संजय वसंत सावंत यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.