सडे गावावर दरडीचे संकट; ३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर pudhari photo
रायगड

Raigad landslide threat : सडे गावावर दरडीचे संकट; ३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

प्रशासनाची तातडीने घटनास्थळी धाव; परिस्थितीचा घेतला आढावा घेतला; अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील मोरसडे ग्रामपंचायत हद्दीतील सडे गावावर दरडीचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावातील १३ कुटुंबांतील ३७ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगरातील माती पूर्णपणे भुसभुशीत झाली असून, गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगरावर मोठी दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सडे गावाला दरवर्षी पावसाळ्यात दरडीचा धोका निर्माण होत असतो. यंदा अतिवृष्टीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराच्या उतारावर भेगा पडल्याची आणि माती सरकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, रायगड जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, शिवसेना तालुका प्रमुख निलेश आहिरे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सह कर्मचारी , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चिमाजी हंबीर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी अविनाश कांबळे, तलाठी सुनील वैराळी तसेच ग्रामपंचायत अधिकारी विक्रम खुडे यांनी सडे गावाला भेट देऊन परिस्थितीची सविस्तर पाहणी केली.

अधिकाऱ्यांनी गावाच्या वरच्या बाजूच्या डोंगर उताराची, दरडग्रस्त भागाची तसेच घरांच्या परिसराची पाहणी करून संभाव्य धोक्याचा अंदाज घेतला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करता यावे यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने कोकणासह रायगड जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पोलादपूर तालुका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवली आहे. बचाव पथके, आवश्यक यंत्रसामग्री, वैद्यकीय मदत तसेच स्थलांतराची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली असून, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.

चोवीस तास बारकाईने लक्ष - तहसीलदार

तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले की, सडे गावातील परिस्थितीवर प्रशासनाकडून चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हवामानातील बदल, पावसाचा वाढता जोर, डोंगरातील हालचाली आणि माती सरकण्याच्या शक्यतेवर सातत्याने निरीक्षण केले जात आहे. कोणताही धोका वाढल्यास नागरिकांना विलंब न करता सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल. सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेश, अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. दरड कोसळण्याची कोणतीही चिन्हे दिसल्यास तात्काळ महसूल विभाग, ग्रामपंचायत किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT