पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी अचानक भेटी देत पाहणी केली Pudhari
रायगड

Raigad News | पोलादपुरातील दुर्गम शाळांची पं. स. सभापतींकडून अचानक पाहणी; शिक्षक अनुपस्थितीवर संताप, कारवाईचे आदेश

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांची वास्तवस्थिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी अचानक भेटी देत पाहणी केली

पुढारी वृत्तसेवा

Poladpur Panchayat Samiti Sabhapati School Inspection

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांची वास्तवस्थिती जाणून घेण्यासाठी पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे यांनी अचानक भेटी देत पाहणी केली. या पाहणीदरम्यान काही शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थित असतानाही शिक्षक अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी सभापती शिंदे यांनी ढवळे, खोपड, चांदके, उमरठ तसेच ढवळे येथील अंगणवाडीला भेट दिली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

पोलादपूर तालुक्यातील अनेक दुर्गम भागांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असून काही शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. शासनाकडून विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला असून शिक्षण विभागाने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजी शिक्षकांवर कठोर कारवाई करावी, तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबांतील मुले मोठ्या अपेक्षेने शिक्षणासाठी शाळेत येतात. अशा वेळी शिक्षक वेळेवर उपस्थित नसणे ही अत्यंत गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करण्यासारखे आहे. संबंधित शिक्षकांविरुद्ध जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत नियमानुसार प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अविनाश शिंदे, सभापती, पोलादपूर पंचायत समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT