Leopard Attack Pudhari
रायगड

Leopard Attack | पोलादपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Raigad News | महालगुर मोरेवाडी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Leopard Attack Cow Killed

पोलादपूर : तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील महालगुर मोरेवाडी येथे शनिवारी (दि.१५) रात्री बिबट्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महालगुर मोरेवाडी येथील शेतकरी अशोक भाऊ मोरे यांची दुभती गाय बिबट्याने फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली असून, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची चर्चा आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वनपाल बी. टी. पवार व वनरक्षक अमोल रोकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शेतकरी अशोक मोरे यांनीही वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी निवेदन सादर केले आहे.

दरम्यान, वन अधिकाऱ्यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास टाळावा, हातात काठी व बॅटरी ठेवावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच गाव परिसरात रात्री आवाज केल्यास वन्यप्राणी थांबत नाहीत, असे त्यांनी सांगितले. गुरांचे वाडे मजबूत व बंदिस्त ठेवावेत, कुंपण करावे आणि गुरे रानात मोकळी सोडू नयेत, अशा सूचनाही वनविभागाकडून देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT