Chinese center staff beaten Poladpur Raigad
पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील कापडे येथे चायनीज सेंटरवर दारू पिण्यास मनाई केल्याच्या कारणावरून ग्राहकांनी दुकान चालक व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापडे येथील ‘प्रशांत चायनीज’ या दुकानावर फिर्यादी विठ्ठल साने (वय ५५), नंदा साने, प्रतीक साने, प्रशांत साने आणि कृष्णा साने (सर्व रा. गोपालवाडी, पोलादपूर) उपस्थित होते. त्यावेळी आरोपी अजय वाघे आणि अनिल वाघे हे दुकानात आले व त्यांनी राईसची ऑर्डर दिली. त्यांच्या हातात बिअरची बाटली असल्याचे पाहून प्रशांत साने यांनी दुकानात दारू पिऊ नये, ऑर्डर तयार झाल्यानंतर ती दिली जाईल, असे सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने आरोपी अजय वाघे यांनी प्रशांत साने यांच्याशी शिवीगाळ व धक्काबुक्की करत वाद घातला. त्यावेळी विठ्ठल साने आणि कृष्णा साने यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आरोपी अजय वाघे यांनी इतर सहकाऱ्यांसह पुन्हा चायनीज सेंटरवर येत साने कुटुंबीयांना शिवीगाळ, धक्काबुक्की तसेच हाताबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अजय जानू वाघे, अनिल राकेश वाघे, राकेश जानू वाघे, संदीप राकेश वाघे, सुरेखा राकेश वाघे, नारायण वाघे, संतोष नारायण वाघे, अंकुश नारायण वाघे, समीर सुरेश काटे, काशीराम सिताराम जगताप, नामदेव नथुराम मुकणे आणि काळू संजय वाघे (सर्व रा. आदिवासी वाडी, कापडे बु., ता. पोलादपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक शिंदे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.