Heavy Rains Disrupt Life Poladpur Raigad
पोलादपूर : तालुक्यात गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तब्बल १२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने सण-उत्सवाच्या काळात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. या अतिवृष्टीमुळे मुख्य बाजारपेठा आणि शहरातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
तालुक्यातील सरासरी पावसाचे प्रमाण ३,६३६ मिमीच्या पुढे गेले आहे. मागील चार-पाच वर्षांत पावसाचे प्रमाण ४,००० ते ५,००० मिमीपर्यंत पोहोचत असल्याने पोलादपूर हा जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पावसाचा तालुका ठरत आहे. गेल्या ४८ तासांत १७२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ढवली व कामथी नद्यांनी मुसंडी मारल्याने सावित्री नदीला फुगवटा आला आहे.
गेल्या २४ तासांत तालुक्यातील विविध गावांमध्ये खालील प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे:
चांदके: १९६ मिमी
दाभिळ: १५५ मिमी
गोवेले: १४० मिमी
बोरघर: ११२ मिमी
कोंढवी: २७४ मिमी (सर्वाधिक)
पळचिल: १४० मिमी
किनेश्वर: २९५ मिमी
गोळेगणी: १५८ मिमी
पोलादपूर: १२८ मिमी
सवाद: ११८ मिमी
तुर्भे कोंड: १३६ मिमी
बोरवले: १५२ मिमी
या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आजपर्यंतची सरासरी २,८७७ मिमी झाली आहे, जी गतवर्षीच्या तुलनेत ४७३ मिमीने कमी आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी अतिवृष्टी आणि रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सण-उत्सव काळात बाजारपेठांतील व्यवसायांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.