Ambenali Ghat Closed Pudhari
रायगड

Ambenali Ghat Closed | अखेर आंबेनळी घाट चार दिवसांसाठी सर्व वाहनांसाठी बंद

अतिवृष्टीचा इशारा; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Mahabaleshwar Poladpur Road

पोलादपूर : अतिवृष्टीचा इशारा आणि घाटमाथ्यावर सातत्याने दरडी कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने पोलादपूर–महाबळेश्वर राज्य मार्गावरील आंबेनळी घाट शुक्रवार (दि. ३) ते मंगळवार (दि. ७) जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी प्रसिद्ध केले आहेत.

पोलादपूर–आंबेनळी–महाबळेश्वर हा राज्य महामार्ग सह्याद्री पर्वतरांगेतील अतिसंवेदनशील, भूस्खलनप्रवण आणि दरड कोसळण्याचा धोका असलेल्या भागातून जातो. तीव्र उतार, खोल दऱ्या, नैसर्गिक जलप्रवाह, हवामानामुळे विदीर्ण झालेले बेसॉल्ट खडक, अस्थिर मातीचे थर आणि दाट वनक्षेत्र यामुळे पावसाळ्यात या घाटमार्गावर अपघात आणि नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढतो.

भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय गेल्या आठवडाभरात पोलादपूर हद्दीत दोन वेळा दरडी कोसळल्याच्या घटना घडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या मते, अतिवृष्टीमुळे भूस्खलन, दरड कोसळणे, दगड घसरणे आणि भूस्तर खचणे यांसारख्या घटना कोणतीही पूर्वसूचना न देता घडू शकतात. त्यामुळे संभाव्य जीवितहानी आणि अपघात टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सध्या घाटमार्गावर संरक्षण भिंती, क्रॅश बॅरिअर्स, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर सुरक्षाविषयक कामेही सुरू आहेत.

घाटबंदीच्या कालावधीत पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी महाड–माणगाव–ताम्हिणी घाट किंवा पोलादपूर–चिपळूण–कराड या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT