Panvel PMC Departmental Exam
पनवेल : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासकीय, लेखा आणि लेखापरीक्षण संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची अर्हताकारी विभागीय परीक्षा ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील १३४ अधिकारी व कर्मचारी या परीक्षेला बसणार असून, जुने पनवेल येथील विठोबा खंडप्पा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (व्ही. के. हायस्कूल) येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२२ मधील परिशिष्ट-३ तसेच पनवेल महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी (अर्हताकारी विभागीय परीक्षा) नियम, २०२२ मधील तरतुदींनुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेस पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना मे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, नाशिक यांच्यामार्फत आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
तीन दिवसांत एकूण सहा प्रश्नपत्रिकांची परीक्षा होणार आहे. ९ सप्टेंबर रोजी प्रश्नपत्रिका क्रमांक १ सकाळी १० ते दुपारी १ आणि प्रश्नपत्रिका क्रमांक २ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. १० सप्टेंबर रोजी प्रश्नपत्रिका क्रमांक ३ सकाळी १० ते दुपारी १, तर प्रश्नपत्रिका क्रमांक ६ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेतली जाईल. ११ सप्टेंबर रोजी प्रश्नपत्रिका क्रमांक ४ सकाळी १० ते दुपारी १ आणि प्रश्नपत्रिका क्रमांक ५ दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका १०० गुणांची आहे.
परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्याच्या किमान १५ मिनिटे आधी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रवेश दिला जाणार नाही. केंद्रात प्रवेशासाठी महापालिकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.
परीक्षार्थींना ८ सप्टेंबर रोजी आस्थापना विभागाकडून हॉल तिकीट घ्यावे लागणार असून, परीक्षेवेळी ते सोबत आणणे आवश्यक आहे. मोबाईल, स्मार्टवॉच किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांना परीक्षा कक्षात मनाई आहे. कॉपी अथवा अन्य गैरप्रकार आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
प्रश्नपत्रिका क्रमांक १ वगळता क्रमांक २ ते ६ या प्रश्नपत्रिका ‘ओपन बुक सिस्टम’ पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेत केवळ मुद्रित पुस्तके वापरण्यास परवानगी आहे. नोट्स, टिप्पण्या, चिठ्ठ्या, हस्तलिखित उत्तरे किंवा अन्य हस्तलिखित साहित्य वापरता येणार नाही.
दरम्यान, ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान परीक्षार्थींच्या भोजनाची व्यवस्था महापालिकेकडून केली जाणार नसून, त्याची व्यवस्था संबंधितांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक हजेरीची आवश्यकता नसल्याचेही कार्यालयीन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.