

पनवेल : भ्रष्टाचाराचा डाग लागलेल्या पनवेल आरटीओ कार्यालयात पुन्हा एका एकदा एका खाजगी एजंट ला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. रिक्षा परमिट नावावर करण्याच्या कामासाठी शासकीय शुल्काव्यतिरिक्त स्वतःसाठी आणि लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या आरटीओ एजंटला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. विलास गणपती सनगर (वय ६२, रा. प्लॉट क्र. ई/४७/३२, सेक्टर-६, फडके स्कूलजवळ, नवीन पनवेल) असे ताब्यात घेतलेल्या एजंटचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३७ वर्षीय असून ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे असलेल्या अधिकारपत्रानुसार रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ते आरटीओ एजंट विलास सनगर यांच्याकडे गेले होते. यावेळी त्यांनी रिक्षा परमिट नावावर करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काबाबत विचारणा केली.
त्यावेळी सनगर यांनी शासकीय शुल्क २५ हजार ७०० रुपये असल्याचे सांगितले. त्याशिवाय स्वतःसाठी तसेच लोकसेवकाच्या नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने ११ ऑगस्ट २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई लाच लुचपत विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान सनगर यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी व लोकसेवकाच्या नावाने एकूण ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एसीबीने मंगळवारी, १ सप्टेंबर रोजी खारघर आरटीओ कार्यालयासमोर सापळा रचला. दुपारी १ वाजून ५६ मिनिटांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ४ हजार ५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सनगर यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सनगर यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे एसीबीने स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक निता भासेले यांनी सापळा अधिकारी म्हणून कारवाई केली. पोलीस उपअधिकारी धर्मराज सोनके हे पर्यवेक्षक अधिकारी होते. सापळा पथकात पोहवा पठाण, महिला पोलीस हवालदार छाया बिंदे आणि पोलीस नाईक विशाल अहिरे यांचा समावेश होता.
तो ‘लोकसेवक’ कोण ?
आरटीओ एजंट विलास सनगर याने स्वतःसह एका ‘लोकसेवकाच्या’ नावाने ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मात्र, हा लोकसेवक नेमका कोण, त्याची या कथित लाचेच्या मागणीत भूमिका काय आणि त्याला याची माहिती होती का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एसीबीच्या पुढील तपासात या ‘लोकसेवका’चा चेहरा समोर येण्याची शक्यता आहे.