Panvel 66 Lakh Gold Robbery  Pudhari
रायगड

Panvel Gold Theft | झटपट श्रीमंत होण्याच्या नादात बारावीच्या विद्यार्थ्याने ६६ लाखांचे सोने चोरले; ४८ तासांत जेरबंद

सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथून तरुण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Panvel 66 Lakh Gold Robbery

पनवेल : इतरांप्रमाणे झटपट श्रीमंत होऊन ऐषआरामी जीवन जगण्याच्या मोहापायी बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या सोन्याच्या सहा लगडी घेऊन पलायन केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे.

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी विश्वासाने त्याच्याकडे सोपविण्यात आलेले ६६६.२३ ग्रॅम सोने घेऊन तो फरार झाला होता. मात्र, पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत त्याचा माग काढत सांगोला तालुक्यातील खिलारवाडी येथून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याच्या सहाही लगडी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समध्ये काम करणाऱ्या या अल्पवयीनाकडे फिर्यादींनी सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सहा सोन्याच्या लगडी दिल्या होत्या. या लगडींचे एकूण वजन ६६६.२३ ग्रॅम असून त्यांची किंमत ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये आहे. मात्र, मौल्यवान सोन्यावर त्याची नजर गेली आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सर्व लगडी घेऊन पलायन केले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, बारावीत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्याला कमी वेळेत मोठा पैसा कमावून श्रीमंत व्हायचे होते. पैसा आणि ऐषआरामी जीवनाच्या मोहातून त्याने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी तातडीने स्वतंत्र पथके तयार करून अल्पवयीनाचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून त्याच्या हालचालींचा माग काढण्यात आला. या तपासात तो रेल्वेने सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांचे पथक त्याचा माग काढत सांगोला तालुक्यातील खिलारवाडी या त्याच्या मूळ गावी पोहोचले. अखेर तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरी केलेल्या ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या सहा लगडी हस्तगत करण्यात आल्या.

अवघ्या ४८ तासांत ६६ लाखांहून अधिक किमतीचे सोने हस्तगत करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ रश्मी नांदेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग मधुर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, किरण राऊत, पोलीस हवालदार योगेश दिवेकर, अविनाश गंथडे, अमोल पाटील, संदेश म्हात्रे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अन्य अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT