अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
वादळी वाऱ्यासह सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने रायगड जिल्हयातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. शेतात कापून ठेवलेले भात भिजून गेले आहे. 1 हजार गावांतील 18 हजार 575 शेतकऱ्यांना दणका बसला आहे.
रायगड जिल्हयातील भातपीक कापणीला आले आहे. त्यामुळे नवरात्र संपताच शेतकऱ्यांनी कापणीला सुरूवात केली. दिवाळीपूर्वी पीक घरात आणायचे असा शेतकऱ्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी शेतांमध्ये लगबग पहायला मिळत होती. मागील काही दिवसांपासून कडकडीत ऊन पडले होते. काल दिवसभर सर्वत्र ढगाळ वातावरण होते.
संध्याकाळी ढग दाटून आले आणि पावसाने बरसायल सुरूवात केली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दणका दिला. 15 तारखेपासून राज्याच्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला असून काल संध्याकाळी जिल्हयाच्या सर्वच भागात पावसाने वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. यामुळे शेतात कापून ठेवलेल्या भातपीकाला या पावसाचा फटका बसला.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात पिक परिस्थिती यंदा बरी होती. वार्षिक सरासरीच्या तुलनेत कोकणात कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस जवळपास पाच हजार हेक्टरक्षेत्रावरील पीकांना पावसाचा फटका बसला होता. त्यापूर्वी जून ते ऑगस्ट या कालावधील 66 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले ोते. आता पुन्हा एकदा पावसाने शेतकरयांचे नुकसान केले आहे.
दिवाळीच्या आधी कापणी पूर्ण करायचे ठरवले होते . म्हणून आम्ही भातकापणी सुरू केली होती पण काल पावसाने अचानक सुरूवात केली. रात्रीची वेळ असल्याने आम्हाला कापलेले पीक वाचवता आले नाही. आता जे राहिले आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरकारने आमच्यावर मेहरबानी करून योग्य ती मदत करावी अशी हात जोडून विनंती आहे.राजेंद्र जुईकर, शेतकरी
पावसाबरोबर आलेल्या वाऱ्यामुळे रायगड जिल्हयात भातपिकांचे नुकसान झाले आहे. आमच्या विभागातर्फे नजर पंचनाम्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पंचनाम्यांचे काम सुरू होईल. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.वंदना शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी