Fishing Ban Pudhari
रायगड

Fishing Ban: पावसाळी मासेमारी बंदीचे मच्छीमारांनी तंतोतंत पालन करा

उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

पंकज ठाकूर

कोप्रोली: महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात 1 जूनपासून लागु झालेल्या पावसाळी मासेमारी बंदी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन उरण मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे व करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी संयुक्तपणे केले आहे.

दरम्यान पावसाळी बंदीच्या आदेशानंतर उरण परिसरातील मोरा, करंजा, खोपटा आदी बंदरात शेकडो बोटींनी नांगर टाकला आहे.

समुद्रातील मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत चाललेल्या मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्त रक्षणाच्या उद्देशाने राज्य शासनाकडून दरवर्षी महाराष्ट्राच्या सागरी जलक्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी लागू केली जाते.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या आदेशानुसार 1 जून 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत (दोन्ही दिवस धरून) महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) 2021 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व मच्छीमार, नौका मालक, तांडेल आणि खलाशी यांनी शासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत याआधीच करण्यात आले आहे.

उरण मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे व करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छीमारांची बैठक बोलाविण्यात आली होती.या बैठकीत करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी मच्छीमारांनी शासनाने केलेल्या पावसाळी मासेमारी बंदीच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन केले.या बंदी दरम्यान संस्थेमार्फत मच्छीमारांना कोणत्याही प्रकारे डिझेलचा पुरवठा केला जाणार नाही.

दुर्घटना घडल्यास मदत मिळणार नाही

बंदीकाळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाईपोटी किंवा दुर्घटना घडल्यास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत संस्थेकडून दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर दंडात्मक अथवा कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही उरण मत्स्यव्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी सुरेश बागुलगावे व करंजा मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी संयुक्तपणे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT