Raigad Agriculture Pudhari
रायगड

Raigad Agriculture News: पावसाच्या विलंबाने खरीप पेरण्या लांबणार; ठिकठिकाणी वळीवाच्या सरी

पेरणीची घाई न करण्याचा प्रशासनाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाच्या आगमनाला अद्याप आठ ते दहा दिवसांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबणार आहेत. शेतकऱ्यांनी भात पेरणीची घाई करू नये, असा महत्त्वाचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात मान्सून सक्रिय होण्यासाठी अद्याप सात ते आठ दिवसांचा अवधी असून 10 जूननंतरच समाधानकारक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसाच्या सरींवर विसंबून पेरणी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात आगामी काही दिवसांत हवामानात लक्षणीय बदल अपेक्षित आहे. कोकणातही ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून स्थानिक वातावरणीय बदलांमुळे होणारा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सध्या मान्सूनचा प्रवास अपेक्षित गतीने होत नसल्याने तो अद्याप केरळ किनारपट्टीवर पूर्णपणे दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यात पडणाऱ्या सध्याच्या पावसाचा आणि मान्सूनच्या आगमनाचा थेट संबंध नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तात्पुरत्या वादळी पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत पेरणी केल्यास बियाणे उगवणीत अडचणी निर्माण होऊ शकतात.

पाऊस खंडित झाल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका असून दुबार पेरणीचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडू शकतो. त्यामुळे सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

वादळी पावसात सतर्क राहा

वीज चमकत असताना झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली किंवा उघड्या जागेत थांबणे धोकादायक ठरू शकते. तसेच विद्युत ट्रान्स्फॉर्मर, विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि पाळीव जनावरांना सांभाळणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT