मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंकवर अपघात झाले. जखमींना उपचारासाठी दाखल करताना. Pudhari photo
रायगड

Raigad|मिसिंग लिंकवर सलग दोन अपघात, प्रतिबंधित मालवाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Raigad Missing Link accidents- मिसिंग लिंकवर सलग दोन अपघात, प्रतिबंधित मालवाहतुकीमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

खालापूर (रायगड): मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या मिसिंग लिंकवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असतानाही वाहतूक सुरूच असल्याने आज सलग दोन अपघात झाले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच इतर यंत्रणा तैनात असतानाही प्रतिबंधित वाहने मार्गावर येत असल्याने या यंत्रणांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मिसिंग लिंकच्या कनेक्टिंग लिंकवर केळी वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. वाहन रस्त्यावर उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला. त्याला स्वामिनी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातानंतर पिकअपमधील केळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विखुरली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील केळी हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

दरम्यान, याच मिसिंग लिंकवर लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील बोगद्यात बस आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी चौघांना खोपोली नगरपालिका रुग्णालय तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल, शिळफाटा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले.

प्रतिबंधित वाहनांचा प्रश्न गंभीर

मिसिंग लिंकवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवास करण्यास प्रतिबंध असतानाही अशा वाहनांचा प्रवेश होत असल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा समोर आले आहे. या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि संबंधित यंत्रणा तैनात असतानाही प्रतिबंधित वाहने मार्गावर पोहोचत असतील, तर प्रत्यक्ष तपासणी आणि अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिसिंग लिंक हा आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अभियांत्रिकीचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरी त्यावरील वाहतूक शिस्त आणि सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे. विशेषतः बोगदे, कनेक्टिंग लिंक आणि उताराच्या भागात अवजड अथवा प्रतिबंधित वाहनांमुळे अपघात झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

आजच्या दोन अपघातांनी केवळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण केला नाही, तर भविष्यातील मोठ्या दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधित वाहतूकवरील नियंत्रण अधिक कठोर करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. प्रतिबंधित मालवाहतूक पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रभावी तपासणी, प्रवेश बिंदूंवर कडक नियंत्रण आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर भविष्यात यापेक्षाही गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT