Raigad bus accident
नाते : सांगली जिल्ह्यातून किल्ले रायगड दर्शनाला आलेल्या विद्यार्थ्यांच्या सहलीची खासगी मिनीबस नांदगाव बुद्रुक येथे पलटी झाली. या अपघातात सहाजण जखमी झाले असून यामध्ये चार विद्यार्थिनी, शिक्षक व चालकाचा समावेश आहे.
अक्षरा अजय ढोवळे (वय 16), आदिती रवींद्र खेरमोडे (वय 16), आदिती दीपक खाडे (वय 16), सिद्धी दीपक ढोवळे (वय 16), चालक योगेश वसंतराव जाधव (वय 35), शिक्षक जगन्नाथ विश्वास येवले (वय 45) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे उपचार करण्यात आले असून त्यापैकी आदिती खेरमोडे ही गंभीर जखमी असल्याने तिला सिटीस्कॅनसाठी माणगाव येथे पाठविण्यात आले.
अन्य जखमींची प्रकृती स्थिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, बाऊच, (ता. वाळवा) या शाळेतील हे विद्यार्थी असून शनिवारी रात्री 11 वाजता ते खासगी मिनीबसने सहलीसाठी निघाले होते. पहाटे 5.50 च्या सुमारास महाडकडून किल्ले रायगडकडे जाताना नांदगाव बुद्रुक गावच्या हद्दीत आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेल्याने हा अपघात घडला. घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.