Aditi Tatkare  Pudhari
रायगड

Aditi Tatkare | म्हसळा तालुक्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल : मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे कार्य कौतुकास्पद

पुढारी वृत्तसेवा

Mhasla Malnutrition Free

म्हसळा : अतिदुर्गम आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या म्हसळा तालुक्यात कुपोषणाविरोधातील लढ्याला यश मिळत असून कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही संख्या आता शून्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने म्हसळा तालुका कुपोषणमुक्त होण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

महिला व बालविकास विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, म्हसळा यांच्या वतीने ‘राष्ट्रीय पोषण माह २०२७’ कार्यक्रमाचे आयोजन म्हसळा कुणबी समाज हॉल येथे करण्यात आले. मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘सुपोषित बालक – सशक्त माता – समृद्ध कुटुंब’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम यावेळी राबविण्यात आले.

कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांचे तटकरे यांनी विशेष कौतुक केले. कुपोषणमुक्तीच्या यशाचे खरे श्रेय या कर्मचाऱ्यांना जाते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामासाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, लवकरच दिवाळी भाऊबीज भेट देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाणी, पोषणयुक्त आहार आणि जीवनावश्यक बाबींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी तयार केलेल्या विविध पोषण आहाराच्या पदार्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले. तटकरे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून बालकांचे आरोग्य, माता-बाल संगोपन आणि पोषणविषयक उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी मंगेश साळी, सीडीपीओ प्रफुल्ल बागल यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अंगणवाडी सेविका-मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजा जंगम यांनी केले, तर प्रास्ताविक धनश्री चव्हाण यांनी केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT