Man Falls 200 Feet into Valley in Raigad District
रायगड : महाबळेश्वर-पोलादपूरला जोडणाऱ्या ऐतिहासिक आणि धोकादायक आंबेनळी घाटात शनिवारी (२० जून) मध्यरात्री एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. मेटतळे वॉटरफॉलच्या पुढे लघुशंकेसाठी गेलेला एक व्यक्ती अचानक तोल जाऊन सुमारे २०० फूट खोल दरीमध्ये कोसळला. मात्र, 'प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम' आणि 'महाबळेश्वर ट्रेकर्स'च्या जवानांनी रात्रीचा मिट्ट अंधार, दाट धुके आणि पावसाने झालेली निसरडी माती अशा सर्व आव्हानांवर मात करत या व्यक्तीला तब्बल २०० ते २३० फूट खोल दरीतून जिवंत बाहेर काढले. या थरारक मोहिमेमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले असून रेस्क्यू टीमच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रात्री पाऊण वाजता मदतीचा कॉल
शनिवारी रात्री साधारण पावणे अकरा वाजेच्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमला आंबेनळी घाटातून या अपघाताबाबतचा फोन आला. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे घाटात प्रचंड धुके आणि गारठा होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून टीमचे सदस्य तातडीने रेस्क्यू साहित्यासह घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम ज्या ठिकाणावरून व्यक्ती खाली पडली, त्या जागेची पाहणी केली.
पोलिसांना माहिती अन तात्काळ सेटअप
सुरवातीला घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचले नव्हते. त्यामुळे टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनेची माहिती महाबळेश्वर पोलीस ठाण्याला दिली. महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे अंमलदार घटनास्थळी दाखल होताच, त्यांच्या सूचनेनुसार जवानांनी दरीत उतरण्यासाठी रोप आणि स्ट्रेचरचा सेटअप लावण्यास सुरुवात केली.
अंधार, धुके आणि निसरड्या वाटांशी झुंज
सेटअप पूर्ण झाल्यावर जवान जीवाची पर्वा न करता खोल दरीमध्ये उतरू लागले. नुकत्याच झालेल्या पावसामुळे दरीतील माती आणि दगड प्रचंड निसरडे झाले होते, त्यातच रात्रीचा अंधार आणि धुक्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते. या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जवानांनी दरीच्या तळाशी शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच तो व्यक्ती दरीत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. सुदैवाने त्याचा जीव वाचला होता.
महाबळेश्वर ट्रेकर्सची मदत अन जिवंत सुटका
दरम्यानच्या काळात 'महाबळेश्वर ट्रेकर्स'ची टीमही मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. पाऊस आणि घसरणीमुळे जखमी व्यक्तीला वर आणणे हे मोठे आव्हान होते. दोन्ही टीमच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने जखमीला स्ट्रेचरवर सुरक्षित बांधले आणि प्रचंड परिश्रम घेत २०० फूट दरीतून ओढून मुख्य रस्त्यावर आणले. जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
जीव वाचवल्याचा आनंद मोठा...
वर्ष २०२६ च्या सुरुवातीपासून प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने आंबेनळी घाटात अनेकदा अपघातग्रस्त वाहने किंवा मृतदेह बाहेर काढण्याचे (रिकव्हरी) काम केले आहे. मात्र, आज एका व्यक्तीला २०० ते २३० फूट खोल दरीतून सुखरूप आणि जिवंत बाहेर काढण्यात यश आले. एकाचे प्राण वाचवू शकलो, याचा संपूर्ण टीमला सार्थ अभिमान आणि आनंद आहे, अशी भावना जवानांनी व्यक्त केली.
मोहिमेत सहभागी झालेले जवान आणि पोलीस
या धाडसी मोहिमेमध्ये प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, संकेत सावंत, मुन्ना उतेकर, अवि उतेकर, आदेश मोरे, निखिल सावंत, अभि सपकाळ, रुपचंद मंडल, गणेश वागदरे आणि विक्रांत जाधव यांनी सहभाग घेतला. तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सोमनाथ वागदरे, सुजित कोळी, दिपक ओंबळे आणि श्रीकांत नाविलकर यांनी मोलाची मदत केली. महाबळेश्वर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाचे सहकार्य केले.