Raigad Electricity Board Pudhari
रायगड

MSEDCL Smart Meter | रायगडमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटर मोहिमेला यश; अलिबागच्या चौल-२ शाखेने मिळविला पहिला मान

चौल-२ शाखा कार्यालय रायगड जिल्ह्यातील पहिले १०० टक्के स्मार्ट मीटरयुक्त कार्यालय

पुढारी वृत्तसेवा

Raigad Chaul 2 Subdivision Smart Meter

रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून कोकण प्रादेशिक विभागाने यामध्ये आघाडी घेतली आहे. कोकण विभागात आतापर्यंत ४३ लाख ३ हजारांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. त्यापैकी भांडुप परिमंडलाने १० लाखांपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवून राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे.

रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयांतर्गत चार विभाग, १७ उपविभाग आणि १०५ शाखा कार्यालये कार्यरत आहेत. यापैकी अलिबाग-१ उपविभागातील चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व १,५७० वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतरित केले आहे. त्यामुळे चौल-२ हे रायगड जिल्ह्यातील १०० टक्के स्मार्ट मीटर बसविणारे पहिले शाखा कार्यालय ठरले आहे.

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीज बिल मिळत असून मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज वापरावर सतत लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. याशिवाय सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वापरलेल्या विजेवर घरगुती ग्राहकांना विशेष सवलतीचाही लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे ३.४० लाख वीज ग्राहकांना आतापर्यंत एकूण २.८३ कोटी रुपयांची वीजबिल सवलत देण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी साध्य करण्यासाठी चौल शाखेचे अभियंता देवरत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन मोहीम राबविली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वीज वापरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व त्यांनी ग्राहकांपर्यंत पोहोचविले.

अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड आणि उपविभागीय अधिकारी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT