Mahad Vinhere Kurle Ghat Accident
महाड प्रतिनिधी : महाड-विन्हेरे मार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. मागील महिन्यात एसटी बस आणि टेम्पोची धडक ज्या धोकादायक ठिकाणी झाली होती, त्याच ठिकाणी सोमवारी (दि.१०) सकाळी पुन्हा दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. कुर्ले घाटातील या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाड आगारातील कृष्णवाडी-मुमूर्शी-महाड आणि मंडणगड आगारातील मंडणगड-लाटवण-कुंबळे-महाड या दोन एसटी बसमध्ये हा अपघात झाला. दोन्ही बसची समोरासमोर धडक झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसमधील चालक व वाहकांसह प्रतीक विनोद भोसले (१८), प्राची विठ्ठल सपकाळ (१७), प्रियंका गोपाळ सपकाळ (१३), तारा गंगाराम पवार (५३), शीतल दामोदर वाघमारे (४०) आणि सुरेखा जनार्दन भोसले (५५), सर्व रा. मुमूर्शी, महाड, हे जखमी झाले आहेत.
सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, बसची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
मागील वर्षी पावसाळ्यात शिरगाव ते कोंड मालुसरे या मार्गावर एसटीसह अन्य वाहनांचे तब्बल १५ ते १६ अपघात झाल्याची माहिती आहे. चालू वर्षातही एसटी बसचा हा चौथा अपघात असल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार अपघात होणाऱ्या या मार्गावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
कुर्ले घाटातील याच धोकादायक ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाकडून ठोस सुरक्षा उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक, आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक तसेच रस्त्याच्या धोकादायक वळणांवर इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.