

महाड: बदलत्या काळानुसार शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून महाड तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत यांत्रिकी शेतीकडे वेगाने वाटचाल करत आहेत.
मजुरांची टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि वेळेचे नियोजन या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, भातलावणी यंत्र, इतर आधुनिक कृषी अवजारांचा वापर वाढविला आहे. त्यामुळे शेतीची कामे कमी वेळेत, कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेने होत असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक बचतीचा मार्गही मोकळा होत आहे.
महाड तालुका हा भातशेतीसाठी ओळखला जातो. याशिवाय भाजीपाला, कडधान्य आणि इतर हंगामी पिकांचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. पूर्वी शेतीतील बहुतांश कामे मजुरांवर अवलंबून होती.
मात्र, ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर आणि उपलब्ध मजुरांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांसमोर शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
अशा परिस्थितीत यांत्रिकी शेती हा प्रभावी पर्याय ठरत आहे. विशेषतः भातलावणी, नांगरणी, मशागत, फवारणी आणि कापणी यांसारखी कामे आता आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने जलद गतीने पूर्ण केली जातील असे सांगण्यात आले.
यामुळे मजुरीवरील खर्चात लक्षणीय बचत होत असून कमी वेळेत अधिक क्षेत्रावरील शेतीची कामे पूर्ण करणे शक्य होत आहे. परिणामी उत्पादनक्षमता वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होत आहे.
कृषी विभागाकडून विविध कृषी यंत्रांवर अनुदान उपलब्ध करून दिले जात असल्याने अनेक शेतकरी या योजनांचा लाभ घेत आहेत. काही गावांमध्ये शेतकरी गट एकत्र येऊन आगामी काळात या पद्धतीचा अवलंब करतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, यांत्रिकी शेतीमुळे केवळ उत्पादन खर्च कमी होत नाही, तर वेळेवर शेतीची कामे पूर्ण झाल्याने पिकांची गुणवत्ता सुधारते आणि उत्पादनातही वाढ होते. आधुनिक यंत्रांचा वापर केल्यामुळे श्रमाची बचत, इंधनाचा नियंत्रित वापर आणि नियोजनबद्ध शेती करणे शक्य होत आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
महाड तालुका कृषी विभागाकडून मागील काही दिवसापासून तालुक्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते त्याचा परिणाम म्हणून तालुक्याच्या विविध भागांमधून आता यांत्रिकी शेतीला शेतकऱ्यांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हे कृषी विभागाच्या कार्याचे यश मानण्यात येत आहे.