महाड येथे झालेल्या विजय मेळाव्यात बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत  Pudhari
रायगड

Mahad Municipal Council | महाड नगर परिषदेची एमआयडीसीकडील १७ कोटींची थकीत पाणीपट्टी माफ

Uday Samant | उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Mahad MIDC water due

महाड : महाड नगर परिषदेची मागील दोन दशकांपासून एमआयडीसीकडे थकीत असलेली २७ कोटी रुपयांची पाणीपट्टीपैकी तब्बल १७ कोटी रुपये माफ करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महाड येथे झालेल्या विजय मेळाव्यात केली. या निर्णयामुळे महाडकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील कविस्कर व नगरसेवकांच्या सत्काराचा कार्यक्रम महाड शहरातील संत रोहिदास नगर समाज मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री भरत शेठ गोगावले, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विजय आप्पा खुळे, सपना मालुसरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित व पराभूत नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी, महाड नगर परिषदेत मिळालेला विजय हा नवे व जुने कार्यकर्ते एकत्र आल्याचा परिणाम असल्याचे सांगत सर्व महाडकरांचे आभार मानले.

नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी आपल्या भाषणात एमआयडीसीकडे असलेल्या थकीत पाणीपट्टीबाबत लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यास प्रतिसाद देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकूण २७ कोटींपैकी १७ कोटी रुपये माफ करण्यात येत असल्याची घोषणा केली. उर्वरित १० कोटी रुपयांपैकी ८ कोटी मुद्दल व २ कोटी व्याजाची रक्कम नगर परिषदेने पुढील पाच वर्षांत हप्त्यांमध्ये भरावी, असे निर्देश त्यांनी दिले.

नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करताना उदय सामंत यांनी संघर्षातून यश कसे मिळवायचे हे भरत शेठ गोगावले यांच्याकडून शिकावे, असे सांगितले. राज्याचे लक्ष महाड नगर परिषदेकडे लागले होते, यावरून या विजयाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासाला प्राधान्य देण्याची गरज असून समाजकारणाच्या माध्यमातून विकास साधता येतो, असे ते म्हणाले. तसेच नगराध्यक्षपदाचे दावेदार नितीन पावले यांचा उल्लेख करत “पावले म्हणूनच सत्ता आली” अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.

मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात हा विजय नवे-जुने शिवसैनिक तसेच महिला व युवा सेनानी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम असल्याचे सांगून हा विजय महाडकरांचा असल्याचे ठामपणे नमूद केले. रायगड जिल्ह्यातील राजकारणात शिवसेनेची ताकद आता कोणीही नाकारू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्या मनोगतात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी गेल्या तीन दशकांचा महाडचा “वनवास” संपल्याचे सांगत “जिकडे कविस्कर तिकडे सत्ता” हे समीकरण पुन्हा सिद्ध झाल्याचा दावा केला.

जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी या विजयामुळे शिवसैनिकांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाल्याचे सांगत, आगामी काळात मंत्री भरत शेठ गोगावले, विकास गोगावले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाडचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सिद्धेश पाटेकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT