Women injured in bus accident
विन्हेरे : महाड-फाळकेवाडी मार्गावर ताम्हणे गावाजवळ महाड आगारातून निघालेली बस (MH.20.BL.3074) निसरड्या रस्त्यामुळे आज (दि.३) दुपारी घसरली. बसचा टायर रस्त्याच्या बाजूला खचल्याने या अपघातात बसमधील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र विन्हेरे येथे उपचार करून घरी सोडण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी तीनच्या सुमारास महाडकडे जात असताना बस ताम्हणे गावाजवळ रस्त्याच्या निसरड्या परिस्थितीमुळे संतुलन गमावून टायर खचल्याने अपघात झाला. या बसमधील जखमी महिलांमध्ये महाड पंचायत समितीचे माजी सभापती सत्यवान कदम यांच्या पत्नी आणि बाग अळी विन्हेरे येथील शरद नाना सकपाळ यांच्या पत्नी यांचा समावेश होता.
सुदैवाने अपघाताच्या ठिकाणी असलेल्या ओढ्यात बस जाऊन पलटी झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. ताम्हणे गावाजवळील रस्ता एसटी वाहतुकीसाठी धोकादायक असून गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.