

नाते ः इलियास ढोकले
महाडकडून रायगडकडे जाताना नाते गावापासून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला तळोशी या गावाकडे जाणारा फाटा आहे. या फाट्यावरुन तळोशी गावाकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला एक रस्ता जातो. हा रस्ता आपल्याला थेट रंगूमाता या जागृत देवीच्या स्थानाजवळ नेतो. या ठिकाणी स्थान हा शब्द जाणीवपूर्वक लिहिला आहे. कारण या ठिकाणी रुढाथाने आपण म्हणतो तसे देवीचे मंदिरही नाही आणि देवीची मूर्तीही नाही. रंगूमाता म्हणून ही देवी केवळ महाड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात प्रसिद्ध आहे.
देवीचे या ठिकाणचे हे स्थान स्वयंभू आहे. मात्र ते कधी अस्तित्वात आले याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे स्थान अस्तित्वात होते आणि महाराज रायगडवरुन एखाद्या मोहिमेवर निघाले की, रंगूमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेवूनच ते पुढे जायचे अशी अख्यायिका सांगितली जाते. महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिलाजीराव यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान होता. पिलाजीराव हे पार्ट कुटुंबियांचे पूर्वज. आजही पार्ट कुटुंबाकडेच या देवीच्या नित्यपूजेजी जबाबदारी आहे.
पार्टे कुटुंबात पूर्वी सहा भाऊ होते. दरवर्षी गुढीपाडव्याला या सहा कुटुंबांपैकी एका कुटुंबाकडे नित्यपूजेची जबाबदारी देण्यात येते. पुढच्या वर्षीच्या गुढी पाडव्याला ती दुसर्या कुटुंबाकडे सोपविण्यात येते. ही प्रथा परंपरागत चालत आलेली आहे.या ठिकाणी मंदिर नाही. त्याचीही एक अख्यायिका सांगितली जाते. पार्टे कुटुंबियांच्या पूर्वजांनी ज्यावेळेस या ठिकाणी मंदिर बांधण्याचा विचार केला, त्यावेळेस देवीने त्यांना दृष्टांत दिला. निगडी नावाच्या वृक्षाच्या लाकडापासून एका रात्रीत हे मंदिर बांधावे असा तो दृष्टांत होता. एका रात्रीत मंदिर बांधणे शक्य नसल्याने आजतागायत मंदिराचे बांधकाम होवू शकलेले नाही.
रंगूमाता ही नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. देवीसमोर नवस बोलून एखादी मागणी केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते असा अनुभव आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक तो फेडण्यासाठी येथे येतात. आपल्या कुवतीनुसार साडी चोळी, फळे, साड्या, भोजन अर्पण करुन भाविक नवस फेडतात. असंख्य भाविक मांसाहारी भोजन देवीला अर्पण करण्याचा नवस बोलतात. त्यासाठी कोंबडा किंवा बकर्याचा बळी या ठिकाणी दिला जातो. त्याच बळीचे जेवण करुन देवीला अर्पण करण्यात येते आणि भाविकही प्रसाद म्हणून त्याचे सेवन करतात. बळी देण्याच्या या प्रथेला देवीची ’ राखण देणे ’ असे म्हटले जाते.
श्रावण महिन्याचा अपवाद वगळता वर्षभर कोणत्याही दिवशी ही राखण देवीचे भक्त आपल्या सोयीनुसार देत असतात. त्यासाठी स्थानिकां प्रमाणेच महाराष्ट्र आणि गुजराथमधूनही देवीचे भक्त येथे येत असतात.