रायगड : रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात सहा जोडप्यांचा संसार पुन्हा जुळवण्यात यश आले आहे. पेण आणि पाली येथील प्रत्येकी एक तर पनवेल आणि अलिबाग येथे प्रत्येकी दोन जोडप्यांचा संसार सुरु झाला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी मनोमिलन झालेल्या जोडप्यांचे अभिनंदन केले आहे.
दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने राजेंद्र सावंत, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली 14 मार्च रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक न्यायालय आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उदघाटन राजेंद्र सावंत, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा
अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अलिबाग यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटन प्रसंगी अलिबाग येथील न्यायिक अधिकारी, वकिल संघटना अध्यक्ष प्रसाद पाटील, सचिव अमित देशमुख तसेच दृकश्राव्य माध्यमाद्वारे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील न्यायिक अधिकारी, तालुका वकिल संघटनेतील वकिल वर्ग व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 84 हजार 817 प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात यश आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर तेजस्विनी.निराळे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये रायगड जिल्ह्यातील 1 लाख 22 हजार 510 वादपूर्व प्रकरणे व 19 हजार 4 प्रलंबित अशी एकूण 1 लाख 41 हजार 514 प्रकरणे लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी 78 हजार324 वादपूर्व प्रकरणे व 6 हजार 493 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 84 हजार 817 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोकन्यायालयामध्ये निकाली निघाली असून तडजोडीची एकूण रक्कम रुपये 36 कोटी 46 लाख 61 हजार 429 एवढी झाली आहे. लोक अदालतीमध्ये अलिबाग वकील संघटना व रायगड जिल्हयातील सर्व तालुका बकील संघटना यांनी उस्त्फूर्त सहभाग नोंदवला.
श्रीवर्धन : श्रीवर्धन न्यायालयात शनिवारी न्यायाधीश समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. सदरच्या लोकन्यायालयामध्ये 789 प्रकरणे निकाली निघाली आहेत. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेले 195 पैकी 43 व वादपूर्व 1341 पैकी 746 प्रकरणे निकाली निघाली आहेत. सदरच्या लोकन्यायालयामध्ये 16 लाख 55 हजार 184 रुपये रक्कमेची वसुली झालेली आहे. दखलपात्र गुन्हे 41, धनादेश अनादरीत 2 प्रकरणे निकाली निघाली आहेत. वादपूर्व प्रकरणात बँक रिकव्हरी 17 इतर 607 प्रकरणे निकाली निघाली आहेत. लोकन्यायालयाच्या आयोजनात वकील संघटनेचे ज्येष्ठ विधीज्ञ राजेश वावेकर, शैलेश चांदोरकर, पूजा दुर्गावले इतर वकीलवर्ग आणि न्यायालयीन कर्मचारी जयेश गुरव व इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लोकन्यायालयासंदर्भात जनतेमध्ये जास्तीत जास्त जागृती व्हावी व अनेक वर्ष प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गे लावण्यासाठी लोकन्यायालय हा उत्तम पर्याय आहे.समीर शेख, न्यायाधीश, श्रीवर्धन