रमेश कांबळे
अलिबाग: रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात एकूण 115 अपहरणांचे गुन्हे दाखल झाले असून यामध्ये 41 मुले व 83 मुलींचा समावेश आहे.
तर जानेवारी ते एप्रिल 2026 या चार महिन्यात 40 अपहरणाचे गुन्हे दाखल असून यात 7 मुले व 36 मुलींचा समावेश आहे. गेल्या चौदा महिन्यात एकूण 155 अल्पवयीनांचे अपहरण झाले आहे. त्यात 77 टक्के मुली आहेत.
गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुलांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कौटुंबिक वाद, ऑनालाईन पैशांचे अमिष, इतर प्रलोभने या कारणांमुळे गेल्या काही वर्षात अल्पवयीन मुलांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
अनेक वेळा अल्पवयीन मुलींना प्रेम, विवाह किंवा उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून पळवून नेण्याच्या घटनांचे प्रमाण मोठे आहे. तर मुलांनाही नशा, पैशांचे अमिष दाखवून अपहरण केले जाते. मुलांना भीक मागण्यास भाग पाडणे किंवा अवैध कामांसाठी अशा अपहरणांचा वापर केला जातो. रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात एकूण 115 अपहरणाचे गुन्हे दाखल झाले असून यामध्ये 41 मुले व 83 मुलींचा समावेश आहे.
तर जानेवारी ते एप्रिल 2026 या चार महिन्यात 40 अपहरणाचे गुन्हे दाखल असून यात 7 मुले व 36 मुलींचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर 2025 या वर्षात सर्वाधिक 15 गुन्ह्यांची नोंद पेणमध्ये त्याखालोखाल खाोपोली 14, रसायनी 12, कर्जत 11 व माणगाव 9 यानंतर इतर पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झाली आहे.
त्याचप्रमाणे जानेवारी ते एप्रिल 2026 या चार महिन्यांत खोपोलीमध्ये 8, खालापूर 5, अलिबाग व माणगाव प्रत्येकी 3 त्याखालोखाल इतर पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झाली आहे.
2025 मध्ये अपहरण झालेल्या मुलांपैकी 122 मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर जानेवारी ते एप्रिल 2026 या काळात अपहरण झालेल्या 39 मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलांच्या अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
समुपदेशनाची गरज
अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून मुलींना लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्या घर सोडून गेल्याचे निदर्शनास येत आहे. घरातील भांडणांमुळेही लहान मुले, मुली घर सोडून जात आहेत. पालकांनी समजावून सांगितलेले मुले ऐकत नाहीत. घर सोडण्यास तयार होणा-या या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.