Pandavkada waterfall rescue
पनवेल : मुसळधार पावसामुळे खारघर परिसरातील डोंगराळ भागात धबधब्यांचा प्रवाह जोरात वाहू लागला आहे. अशातच आज खारघर येथील ड्रायव्हिंग रेंजच्या पाठीमागे असलेल्या पांडवकडा धबधब्यात आज पाच तरुण पर्यटक अडकून पडल्याची घटना घडली आहे. या पाचही पर्यटकांना वेळीच दिलेल्या मदतीमुळे या पर्यटकांचा जीव वाचला आहे. हे पाच ही पर्यटक मुंबई सायन कोळीवाडा परिसरातील रहिवाशी आहेत.
हे तरुण पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. मात्र सोमवारी सकाळपासून आलेल्या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आणि हे सर्वजण धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले. खाली उतरण्याचा मार्ग पूर्णतः बंद झाला होता. धोकादायक स्थिती लक्षात घेता त्यांनी मदतीसाठी हाक दिली. हे पर्यटक ग्राउंड लेव्हलपासून सुमारे ६०० ते ७०० मीटर आत डोंगराच्या उतारावर अडकले होते. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 'Fire Engine MH 46 G 0053' गाडीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंडांच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून या पाचही तरुणांना एक एक करून दुसऱ्या सुरक्षित बाजूला आणले आणि सुरक्षित खाली उतरवले.
या धाडसी बचावकार्यात पनवेल आणि खारघर अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिशय कुशलतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. बचाव पथकाच्या संयमित आणि धाडसी प्रयत्नांमुळेच ही सुटका शक्य झाली. या संपूर्ण कारवाईनंतर सर्व तरुणांना खारघर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक्ष. प्रदीप आव्हाड यांच्या ताब्यात देण्यात आले.
महेश सुभाष शिरगड (वय २२), राकेश वेलमुर्गन (वय १८), प्रतीक जोग (वय १८), रमेश चिंगमेटे (वय १९),साहील शेख (वय २१) अशी सुटका केलेल्या पर्यटकांची नावे आहेत. सर्वजण सायन येथील केळी वाडा, आंबेडकर चाळ परिसरातील रहिवासी आहेत.
या घटनेमुळे पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना धडा मिळाला आहे. प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास जीव धोक्यात येऊ शकतो, याची ही ठळक उदाहरणे ठरली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डोंगराळ, धबधब्याच्या परिसरात जाण्यापूर्वी हवामान आणि सुरक्षा व्यवस्था तपासणे गरजेचे आहे.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही, मात्र जर बचावपथक वेळीच पोहोचले नसते, तर गंभीर परिणाम होऊ शकले असते. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि पोलीस विभाग यांच्या तातडीच्या कार्यवाहीने या पाच तरुणांचे प्राण वाचले.